पोट नीट साफ होत नाही? पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात करा हे बदल
रोज सकाळी पोट पूर्ण साफ न होणे, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास वाढत असेल तर आहारातील काही सोप्या बदलांनी हा त्रास कमी होऊ शकतो.
सकाळी उठल्यावर पोट व्यवस्थित साफ न झाल्यास संपूर्ण दिवस अस्वस्थ आणि कंटाळवाणा जातो. आतड्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढतो आणि त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो. रोजच्या जेवणात तिखट पदार्थ आणि फायबर कमी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अन्न नीट पचत नाही, असे आढळून येते.
बद्धकोष्ठतेची लक्षणे कशी ओळखायची, याबाबतही सांगण्यात आले आहे. कमी वेळा शौचास होणे, शौच खूप कडक होणे, शौचासाठी जोर लावावा लागणे किंवा शौच झाल्यानंतरही पोट पूर्ण साफ झाल्यासारखे न वाटणे, ही बद्धकोष्ठतेची ठळक लक्षणे आहेत. या लक्षणांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते, पण कालांतराने त्रास आणखी वाढत जातो. बद्धकोष्ठता वेळेत लक्षात न घेतल्यास पुढे मूळव्याध होण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळे जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा शरीरावर लगेच परिणाम दिसतो. म्हणून सतत तिखट किंवा तेलकट खाण्याऐवजी सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करावे, असे सांगितले जाते.
अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत, याविषयी काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर सतत अपचन होत असेल तर आहारात बदल करणे गरजेचे आहे. फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि सॅलड यांसारख्या पदार्थांतून शरीराला पुरेसे फायबर मिळते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत राहते आणि विषारी घटक सहज बाहेर पडतात. उलट, मैदा, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा कमी तंतुमय पदार्थ जास्त खाल्ल्यास मलाचा आकार आणि मऊपणा कमी होतो, त्यामुळे शौचाला त्रास होणे, पोटात जळजळ आणि मल कडक होणे यांसारख्या समस्या वाढतात. यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास मोठ्या आतड्यांमधील मलातून जास्त पाणी शोषले जाते, ज्यामुळे उलटी, मळमळ किंवा अपचनाचा त्रास वाढू शकतो. दिवसभर कमी पाणी पिणे, जास्त घाम येणे किंवा उलटी-जुलाब यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे तहान लागण्याची वाट न पाहता भरपूर पाणी आणि ताकासारखे थंड पदार्थ घ्यावेत, असे सुचवण्यात आले आहे. दिवसभर बसून राहणे, व्यायाम न करणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही पचनक्रिया बिघडते, असेही नमूद करण्यात आले आहे.
पोट स्वच्छ होण्यासाठी नुसते आहारातील बदल पुरेसे नाहीत, दैनंदिन सवयींमध्येही बदल आवश्यक आहेत. झोपेची अनियमित वेळ, ताणतणाव आणि दिनचर्येतील बदल यांचाही पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे कामाच्या वेळेत सुसूत्रता, सात्विक आहार, भरपूर पाणी, फळे-भाज्यांचा आहारात समावेश आणि नियमित शारीरिक हालचाल गरजेची आहे. रोज ठरलेल्या वेळी शौचाला जाण्याची सवय ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे. अन्यथा आतड्यांमध्ये घाण साचून राहते आणि त्यामुळे उलटी, मळमळ यांसारख्या समस्या वाढू शकतात.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.