रॅम दमदार असूनही स्मार्टफोन वारंवार हँग होतोय? जाणून घ्या कारणं
८GB, १२GB किंवा १६GB रॅम असूनही फोन हँग होऊ शकतो. प्रोसेसर, स्टोरेज आणि बॅकग्राउंड अॅप्सचाही फोनच्या वेगावर परिणाम होतो.
नवीन स्मार्टफोन घेताना बहुतेक जण कॅमेरा, रॅम आणि बॅटरी या तीन प्रमुख गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष देतात. ८GB, १२GB किंवा १६GB रॅम असलेला फोन जास्त चांगला मानला जातो. असे फोन हँग होत नाहीत, असं अनेकांना वाटतं. पण खरंच तसं असतं का, हा प्रश्न आहे.
कारण दमदार रॅम असलेल्या फोनमध्येसुद्धा अनेकदा हँग होण्याची समस्या येते. अशावेळी फोन स्लो होतो आणि त्यातले अॅप्स नीट चालत नाहीत. मग यूजर्सच्या मनात प्रश्न येतो की, रॅम पावरफुल असताना फोन हँग का होतो आणि फोनचा परफॉर्मंस खराब का होतो? त्याची कारणं एकेक करून बघूया.
पहिली गोष्ट म्हणजे फोनचा वेग फक्त रॅमवर अवलंबून नसतो. फोनमध्ये वापरलेला प्रोसेसर, स्टोरेजची स्पीड, सॉफ्टवेयर ऑप्टिमाइजेशन आणि बॅकग्राउंडला सुरू असणारे अॅप्स मिळून फोनचा परफॉर्मंस ठरवतात. अशावेळी तुमच्या फोनमध्ये फास्ट रॅम असेल, पण प्रोसेसर जुना असेल, तर डिव्हाईसचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो.
दुसरं कारण स्टोरेजचं आहे. फोनचं इंटरनल स्टोरेज फुल झालं असेल, तर फोन स्लो होऊ शकतो. सिस्टिमला टेम्पररी फाइल्स, अॅप डेटा आणि कॅशसाठी स्टोरेजची गरज असते. स्टोरेज फुल असेल आणि स्पेस खूप कमी उरली असेल, तर अॅप उघडायला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळेही फोन स्लो होऊ शकतो.
तिसरं कारण म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्स. अनेकदा असंही घडतं की, बॅकग्राऊंडमध्ये चालणाऱ्या अॅप्समुळे फोनच्या परफॉर्मंसवर परिणाम होतो आणि फोन स्लो होतो. सोशल मीडिया, मेसेजिंग, क्लाऊड बॅकअप आणि लोकेशनसारख्या सर्विस फोनचे रिसोर्स वापरतात. त्यामुळे रॅम आणि प्रोसेसर या दोन्हींवर जास्तीचा भार पडू शकतो.
मग ही समस्या कशी सोडवायची? फोनमध्ये पुरेसं स्टोरेज रिकामं ठेवा. नको असलेले अॅप्स फोनमधून काढून टाका. बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अनावश्यक अॅप्स बंद करा. सिस्टिम आणि अॅप्स नेहमी अपडेट ठेवा.
या टिप्स पाळूनही फोन हँग होत असेल, तर समस्या फक्त रॅमची नाही. ती स्टोरेज, प्रोसेसर, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरशी संबंधित देखील असू शकते. म्हणजेच फक्त मोठी रॅम बघून फोन घेणं पुरेसं नसतं, हेच यातून दिसतं.