सफाळे पूर्व पट्ट्यात बिबट्याचा हल्ला, नावझेच्या जुई पाड्यात गाईची शिकार, बैलाला फरफटत नेले
पालघरमधील सफाळे पूर्व पट्ट्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने घराजवळ बांधलेल्या जनावरांवर हल्ला केला. ग्रामस्थांनी नुकसानभरपाई आणि पिंजऱ्याची मागणी केली आहे.
पालघरमधील सफाळे भागात बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सफाळे पूर्व पट्ट्यातील नावझे येथील जुई पाड्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने घराजवळ बांधलेल्या जनावरांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका गाईची शिकार झाली, तर एका बैलाला बिबट्याने फरफटत नेले.
मागील काही काळापासून महाराष्ट्रात बिबट्यांचा वावर खूपच वाढला आहे. जंगलापर्यंत मर्यादित असलेले बिबटे लोकवस्तीत घुसल्याच्या घटना वेळोवेळी घडत होत्या. अशीच एक घटना नुकतीच सफाळे भागात घडली आहे. सफाळे पूर्व पट्ट्यात बिबट्याचा वावर वाढलेला दिसून आला होता, आणि आता हा हल्ला झाला.
जुई पाड्यातील शेतकरी रमेश जाधव यांनी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या झाडांना जनावरे बांधली होती. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्या जनावरांवर हल्ला केला. हा सगळा प्रकार इतका भयानक होता की त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी पहाटे जाधव कुटुंबीय जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी गेले, तेव्हा गोठ्याजवळ रक्ताचे डाग आणि जनावरांचे अवशेष त्यांना आढळून आले. हे सगळे पाहून ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. ते दृश्य अंगावर काटा आणणारे होते. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांपूर्वी सफाळे पूर्वेतील साखरे परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले होते.
वन विभागाने यापूर्वी नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. पण आता बिबट्या थेट लोकवस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ले करत असल्याने शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. जनावरांवरील हल्ल्यानंतर बिबट्या माणसांची शिकार करायला सुरुवात करेल, अशी भीती व्यक्त होत आहे. माणसांच्या रक्ताची चटक लागल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही, असे ग्रामस्थांना वाटते.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. मृत जनावरांची नुकसानभरपाई तातडीने द्यावी, तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या धाकाखाली आयुष्य जगण्याची वेळ आमच्यावर आली आहे का, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.