डेरा इस्माईल खान मध्ये मोठा बॉम्बस्फोट, ११ जणांचा मृत्यू, ३० जखमी
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान शहरात शनिवारी एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या स्फोटात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. स्थानिक आपत्कालीन सेवा असलेल्या Rescue ११२२ यांनी या मृत्यू आणि जखमींच्या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. सध्या तरी या घटनेबाबत याहून अधिक माहिती समोर आलेली नाही.
स्फोट झाल्याबरोबर परिसरातील लोकांची पळापळ झाली आणि अफरातफरी माजली. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. काहीच वेळात आपत्कालीन पथकं घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींपैकी अनेकांना कानांवर आणि डोळ्यांवर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर विशेष वैद्यकीय उपचार सुरु आहेत. काही जखमींची अवस्था नाजूक असून त्यांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे, असं सांगितलं जातंय.
स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात कारवाई वाढवली असून श्वान पथकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तिथे प्रत्यक्ष हजर असलेल्या लोकांनी तो स्फोट किती जबरदस्त होता, हे सांगण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या स्फोटामागचे नेमके कारण किंवा तो कोणत्या प्रकारचा स्फोट होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच पाकिस्तानातील कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानच्या संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा तपास सुरु असून पुढील तपशील समोर येण्याची प्रतीक्षा आहे. ही घटना अद्याप विकसित होत असलेली बातमी असून यात वेळोवेळी नवी माहिती समोर येऊ शकते.
स्फोटाचे नेमके ठिकाण, त्यामागचे कारण आणि यासाठी जबाबदार व्यक्ती किंवा संघटना कोण, याबाबतची माहिती पुढील तपासातूनच समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे बॉम्बस्फोट कधी थांबणार आणि निरपराध लोकांचे जीव घेणे कधी बंद होणार, याचे उत्तर सध्या तरी पाकिस्तानातील जनतेकडे नाही. आता पाकिस्तानात क्रांतीची वेळ आली आहे, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.