सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:53 IST

कृष्णा-गोदावरी बेसिनमध्ये ऑईल इंडियाला नैसर्गिक वायूचा नवा मोठा साठा सापडला

सरकारी कंपनी ऑईल इंडियाने समुद्राच्या उथळ पाण्यातील ब्लॉकमध्ये नैसर्गिक वायूचा नवा साठा शोधला आहे. आयातीवरचा ताण कमी होण्यास यामुळे मदत होईल.

कृष्णा-गोदावरी बेसिनमध्ये ऑईल इंडियाला नैसर्गिक वायूचा नवा मोठा साठा सापडला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सरकारी कंपनी ऑईल इंडिया लिमिटेड (OIL) ने कृष्णा-गोदावरी बेसिनमध्ये (Krishna-Godavari Basin) नैसर्गिक वायूचा नवा आणि मोठा साठा शोधून काढला आहे. समुद्राच्या उथळ पाण्यातील एका ब्लॉकमध्ये हा साठा सापडला. जगभरात ऊर्जा पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण होत असताना, त्या पार्श्वभूमीवर हा शोध भारतासाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे.

ऑईल इंडियाने 'डिस्कवर्ड स्मॉल फील्ड' (DSF) बोली प्रक्रियेअंतर्गत हा ब्लॉक नुकताच आपल्या नावावर केला होता. पूर्व किनारपट्टीवरील कृष्णा-गोदावरी बेसिनमधील मत्स्यपुरी फॉर्मेशनच्या 'गोदावरी-1' या उथळ पाण्यातील ऑफशोर कुपात ही शोधमोहीम राबवण्यात आली. कंपनीने 16 ऑक्टोबर 2026 रोजी सुमारे 2024 ते 2027 मीटर खोलीवर हायड्रोकार्बन क्षेत्राची चाचणी सुरू केली होती. या सखोल तपासणीदरम्यान त्या भागात नैसर्गिक वायूचा भरपूर साठा लपलेला असल्याची पुष्टी झाली.

सुरुवातीच्या टप्प्यात या कुपातून दररोज सुमारे 1 लाख एससीएमडी (SCMD - Standard Cubic Meters per Day) वायू मिळत होता. मात्र पुढच्या चाचण्या होत गेल्या, तसा हा प्रवाह वाढत जाऊन जास्तीत जास्त 2 लाख एससीएमडीपर्यंत पोहोचला. याशिवाय या कुपातून रोज अंदाजे 170 बॅरल कंडेनसेट मिळत असल्याची महत्त्वाची माहिती कंपनीने दिली आहे. या क्षेत्रात याआधी कधीही कोणतीही तपासणी झाली नव्हती, त्यामुळे हा शोध संशोधकांसाठीही एक मोठे यश ठरला आहे.

सध्या भारत आपल्या गरजेच्या सुमारे 50 टक्के नैसर्गिक वायू आणि तब्बल 88 टक्के कच्चे तेल इतर देशांकडून आयात करतो. अशा परिस्थितीत देशातच गॅसचा नवा स्रोत उपलब्ध झाल्याने आयातीचा मोठा ताण कमी होईल आणि देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचायला मदत होईल.

घरगुती आणि औद्योगिक वापराच्या दृष्टीने या वायूचा सीएनजी (CNG), पीएनजी (PNG), रासायनिक खतांची निर्मिती, वीज निर्मिती आणि रिफायनरी उद्योगांना विशेष फायदा होणार आहे.

या प्रकल्पातून रोज मिळणाऱ्या 22 लाख एससीएमडी गॅसमध्ये सुमारे 20 हजार कुटुंबांची महिनाभराची गरज भागू शकते. तसेच या गॅसवर सीएनजी गाड्या सुमारे 35 लाख किलोमीटर धावू शकतात, किंवा 8 ते 10 लाख युनिट वीज तयार करता येऊ शकते.

भारत सरकारने देशातील गॅस उत्पादन एकूण वापराच्या 15 टक्क्यांपर्यंत नेण्याचे धोरण आखले आहे. सध्या देशात लागणाऱ्या गॅसपैकी फक्त 6 टक्के गॅस देशातच तयार होतो. या नव्या शोधामुळे ते लक्ष्य गाठण्याचा मार्ग अधिक सोपा होईल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ