नायरा एनर्जीकडून पेट्रोल ५ रुपयांनी, डिझेल ३ रुपयांनी महाग; शनिवारपासून नवे दर लागू
नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांचे किरकोळ दर मात्र सध्या बदललेले नाहीत.
देशातील आघाडीची खाजगी इंधन विक्रेती कंपनी नायरा एनर्जी हिने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. पेट्रोल प्रति लिटर ५ रुपयांनी, तर डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले आहे.
हे नवे दर शनिवारपासून तात्काळ लागू झाले आहेत. त्यामुळे नायराच्या पंपांवर आता पेट्रोल प्रति लिटर १००.७१ रुपयांना, तर डिझेल प्रति लिटर ९१.३१ रुपयांना मिळणार आहे.
जगभरात सुरू असलेल्या तणावाचा फटका मोठ्या प्रमाणावर सगळ्या जगाला बसत आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या निर्यातीवर दिसतो आणि त्यामुळे देशातल्या पेट्रोल व डिझेलच्या किमती वर खाली होत राहतात. सगळ्यात आधी थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलवरच जाणवतो. आताही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अचानक वाढल्या आहेत आणि त्याचा मोठा झटका ग्राहकांना बसला आहे.
नायराचा हा निर्णय जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधल्या तीव्र चढ उताराच्या काळात घेतला गेला आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय किमती आणि देशातल्या विक्री किमती यांच्यातली तफावत भरून काढण्यासाठी कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करतो. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले की त्याचा परिणाम शुद्धीकरणाच्या आणि इंधन विक्रीच्या खर्चावर होतो.
याआधी नायरा एनर्जीने मार्च २०२६ मध्ये पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटर अशी वाढ केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरम पडल्या. त्या वेळी कंपनीने १ जुलैला पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटरचा फेरबदल केला.
सरकारी तेल विपणन कंपन्यांचे किरकोळ इंधन दर सध्या तरी बदललेले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झालेले असतानाही देशातल्या इंधन किमतींबाबत सरकारी आणि खाजगी कंपन्यांची धोरणे वेगळी दिसत आहेत.
स्थानिक कर, व्हॅट आणि इतर शुल्कांमुळे नायराच्या या दरवाढीचा परिणाम राज्याराज्यात वेगवेगळा असू शकतो. प्रति लिटर ५ रुपयांची मूळ वाढ झाली असली, तरी ग्राहकाला प्रत्यक्षात द्यावी लागणारी अंतिम किंमत राज्यानुसार बदलू शकते.
या दरवाढीचा फटका फक्त गाडीवाल्यांनाच बसेल असे नाही. डिझेल महाग झाल्याने वाहतूक आणि लॉजिस्टिक्सचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे मालवाहतुकीवर आणि काही विशिष्ट वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.