एसीपी पदासाठी नवी मुंबईतील ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची निवडसूची तयार
महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नती प्रक्रियेअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा एसीपी पदाच्या निवडसूचीत समावेश झाला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचे प्रमुख बदलण्याची शक्यता आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्र पोलीस दलात सध्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठा प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयातील ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा 'पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त' म्हणजेच एसीपी पदाच्या निवडसूचीत (पात्रता यादीत) समावेश करण्यात आला आहे.
या यादीमुळे रबाळे एमआयडीसी, रबाळे, वाशी, सानपाडा, नेरूळ, एनआरआय सागरी, खारघर, उलवे, खांदेश्वर आणि पनवेल शहर या संवेदनशील व महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचे नेतृत्व बदलणार आहे. निवड आणि सेवापुस्तिका पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या जागा रिकाम्या होतील. मग तिथे कोणते नवे अधिकारी येतात, याकडे नवी मुंबई पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
निवडसूचीत समावेश झालेले प्रमुख अधिकारी आणि त्यांची सध्याची पोलीस ठाणी अशी आहेत: बाळकृष्ण साहेबराव सावंत (रबाळे पोलीस ठाणे), देविदास प्रभाकर काटाळे (रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे), शशिकांत शिवाजीराव चांदेकर (वाशी पोलीस ठाणे), दीपक विजय सुर्वे (सानपाडा पोलीस ठाणे) आणि अजय पांडुरंग कांबळे (नेरूळ पोलीस ठाणे).
त्यांच्यासोबत सुनील आनंदा वाघमारे (एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे), अर्जुन रामकृष्ण रजाणे (उल्वे पोलीस ठाणे), संजय वामन जोशी (खारघर पोलीस ठाणे), स्मिता वाल्मीक ढाकणे (खांदेश्वर पोलीस ठाणे), बाळा रघुनाथ कुंभार (पनवेल शहर पोलीस ठाणे) आणि औदुंबर भालचंद्र पाटील (गुन्हे शाखा, कक्ष ३) यांचाही यादीत समावेश आहे.
वाहतूक आणि इतर शाखांमधील अधिकारीही या यादीत आहेत. कोपरखैरणे वाहतूक शाखेचे राजेश रुद्रममी नंदीमठ, खारघर वाहतूक शाखेच्या गुलफरोज मौला आली मुजावर आणि तुर्भे एमआयडीसी वाहतूक शाखेचे अजय पांडुरंग भोसले यांची नावे निवडसूचीत आहेत.
याशिवाय साईड ब्रँच व वाहतूक शाखेत काम करणारे संतोषकुमार श्रीमंदार काणे, अविनाश एकनाथ काळदाते, तानाजी रामदास भगत, सतीश संभाजीराव कदम, नंदकिशोर मुरलीधर बधे, वैशाली अशोक गलांडे, शत्रुघन देविदास माळी, ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी, प्रदीप रामनाथजी लांडे, महेशकुमार प्रल्हाद सरतापे आणि तानाजी महादेव नारनवर यांचीही नावे यादीत आहेत.
अंतिम निवडसूची जाहीर करण्यापूर्वी या सर्व अधिकाऱ्यांचे सेवापुस्तक, गोपनीय अहवाल, प्रलंबित विभागीय चौकशी आणि इतर कायदेशीर बाबी बारकाईने तपासल्या जात आहेत. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र अधिकाऱ्यांची पदोन्नतीची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
दरम्यान, यादी जाहीर झाली असली तरी वैयक्तिक किंवा तांत्रिक कारणांमुळे काही अधिकारी प्रमोशन नाकारण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नियमांनुसार जे अधिकारी पदोन्नती नाकारतील, त्यांना पुढे 'साईड ब्रँच' म्हणजे कमी महत्त्वाच्या शाखांमध्ये पाठवले जाऊ शकते, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
बदल्या आणि पदोन्नतीची ही सगळी प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिकाम्या होणाऱ्या या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांची जबाबदारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे कोणत्या नव्या आणि तडफदार अधिकाऱ्यांवर सोपवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.