मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

नाशिक जिल्ह्यात ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून जास्त पावसाची दडी, खरीप संकटात

नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला असून, शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

नाशिक जिल्ह्यात ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून जास्त पावसाची दडी, खरीप संकटात
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नाशिक जिल्ह्यात पावसाने बरेच दिवस दडी मारल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडला आहे. १५ सप्टेंबरपर्यंतच्या मंडळनिहाय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ५४ कृषी मंडळांत तब्बल २१ दिवस किंवा त्याहून अधिक काळ पाऊस पडलेला नाही. यातील १५ मंडळांत तर ४० दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. यामुळे उभी पिके पाण्याअभावी करपू लागली असून, अनेक भागांत शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

सुरुवातीच्या पावसावर उगवलेली पिके आता पाणी नसल्याने वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि मशागतीवर केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळ स्तरावर दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाल्याचे समजते, आणि यामुळे शेतकऱ्यांना आता पंचनामे, नुकसानभरपाई आणि शासकीय मदतीची आस लागली आहे.

पावसाच्या खंडाची सर्वाधिक तीव्रता काही ठराविक मंडळांत जाणवते आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथे ४५ दिवस, कळवण तालुक्यातील मोकभणगी येथे ४० दिवस, तर मालेगाव तालुक्यातील कौळाणे, सौंदाणे आणि निमगाव येथे प्रत्येकी ४५ दिवसांचा खंड आहे. दाभाडी येथे ४४ दिवस पाऊस नाही, तर नांदगाव तालुक्यातील जातेगाव, हिसवळ बु. आणि भर्डी या तिन्ही मंडळांत प्रत्येकी ४५ दिवसांची उघडीप आहे.

येवला तालुक्यातील येवला आणि सावरगांव मंडळांत ४२ दिवस, तर पाटोदा आणि जळगाव मंडळांत ४१ दिवसांचा खंड नोंदवला गेला आहे. सिन्नर तालुक्यातील सिन्नर मंडळात ४० तर शहा मंडळात ४२ दिवसांचा खंड आहे. सिन्नर तालुक्यातील एकूण सिन्नर, शहा, नांदूरशिंगोटे, सोनांबे, डुबेरे, वावी, वडांगळी आणि गोंदे या आठ मंडळांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड आहे. यापैकी सोनांबे मंडळात ३७, वडांगळी मंडळात २७, नांदूरशिंगोटे, डुबेरे आणि वावी या तिन्ही मंडळांत प्रत्येकी २५, तर गोंदे मंडळात २३ दिवसांचा खंड आहे.

सिन्नर तालुक्यातील एकूण १२ पैकी ८ कृषी मंडळांत २१ ते ४० दिवसांचा दीर्घ खंड पडल्याने येथील पिके जवळपास हातची गेली आहेत. जिथे थोडेफार पाणी शिल्लक आहे, तिथेही अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज सिन्नर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी व्यक्त केला.

तालुकानिहाय पाहिले तर मालेगाव, सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यांत प्रत्येकी ८ कृषी मंडळे २१ दिवसांपेक्षा अधिक खंडाच्या कक्षेत येतात. नांदगावमध्ये ७ मंडळे, बागलाण आणि कळवणमध्ये प्रत्येकी ६ मंडळे, तर चांदवड, देवळा आणि नाशिक तालुक्यात प्रत्येकी ३ मंडळांचा यात समावेश आहे. दिंडोरी आणि निफाड तालुक्यांत प्रत्येकी एका मंडळात दीर्घ खंड नोंदवला गेला आहे. मालेगाव, सिन्नर आणि येवला हे तालुके यादीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकूणच जिल्ह्यातील खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पंचनामे कधी होणार, नुकसानभरपाई किती मिळणार आणि दुष्काळी मदतीबाबत शासन काय पावले उचलणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ