गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नालासोपाऱ्यातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमध्ये डिजिटल वर्ग, आमदार राजन नाईक यांच्या निधीतून उपक्रम

नालासोपाऱ्यातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमध्ये डिजिटल वर्ग, आमदार राजन नाईक यांच्या निधीतून उपक्रम छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिक्षण PT24 टीम

नालासोपारा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमध्ये आमदार निधीतून डिजिटल वर्ग उभारण्यात आले असून गुरुवारी त्यांचे उद्घाटन झाले.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमधले विद्यार्थी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल शिक्षण घेऊ शकतील. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या आमदार निधीतून या शाळांमध्ये डिजिटल वर्ग उभारण्यात आले आहेत. गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते या डिजिटल वर्गांचे उद्घाटन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्याच दिशेने पाऊल टाकत आमदार राजन नाईक यांनी नालासोपारा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 41 शाळा डिजिटल करण्याचा पुढाकार घेतला. हा उपक्रम त्यांच्याच आमदार निधीतून पूर्ण झाला आहे.

मुलांना शाळेच्या वयातच डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकवणे अधिक प्रभावीपणे करता यावे, या हेतूने हे डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी मिळतील.

यावेळी बोलताना आमदार राजन नाईक म्हणाले की, डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. तोपर्यंत या शाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे त्यांनी सांगितले.

भारताचे भविष्य घडवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ई-विद्या, वन क्लास वन चॅनल, डिजिटल लॅब आणि डिजिटल युनिव्हर्सिटी यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रगतीची दिशा मिळेल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.

आमदार निधीतूनच पुणे येथील सुपरमाइंड संस्थेकडे डिजिटल बोर्ड आणि इतर साहित्याच्या देखभालीची जबाबदारी तीन वर्षांसाठी देण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या, तर ही संस्था विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करेल, अशी माहिती भाजपचे महामंत्री मनोज बारोट यांनी दिली. याबाबत सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन विभागाचे अजय दळवी, सुपरमाइंड संस्थेच्या संचालिका अश्विनी भालेकर, समीर साळुंके, प्रकल्प प्रमुख शंतनू पवार आणि आशिष पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका आणि शिक्षकही हजर होते. नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका रुचिता सूर्यवंशी यांनीही डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

#नागपूर#पढ़ाई#PT24#Education#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ