गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नागपूर पदवीधर विधानपरिषद मतमोजणीत अभिजीत वंजारी विजयी, भाजपचे सुधाकर कोहळे पिछाडीवर

नागपूर पदवीधर विधानपरिषद मतमोजणीत अभिजीत वंजारी विजयी, भाजपचे सुधाकर कोहळे पिछाडीवर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

नागपूर विभाग विधानपरिषद मतदारसंघात मतमोजणीदरम्यान अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतली आणि पहिल्या व दुसऱ्या पसंतीच्या मतांवर त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

नागपूर विभाग विधानपरिषद मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठी घडामोड पाहायला मिळाली. मोजणी सुरू असताना अभिजीत वंजारी यांनी अचानक आघाडी घेतल्याचे दिसून आले. शेवटी त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची बेरीज करून वंजारी यांना एकूण 67 हजार 231 मते मिळाली. भाजपचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी 3271 मतांनी विजय मिळवला. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले.

मंगळवारी नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरुवात झाली. ही मोजणी जवळपास 41 तास चालली. मतमोजणी केंद्रात निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी आणि इतर नियुक्त अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण 1 लाख 65 हजार 906 मते होती. त्यापैकी 15 हजार 32 मते अवैध ठरली, तर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. या दोन फेऱ्यांत कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी लागणारा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची बाद फेरी घेण्यात आली.

दुसऱ्या पसंतीच्या बाद फेरीतही कोणत्याही उमेदवाराचा निश्चित कोटा पूर्ण झाला नाही. अखेर पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या फेऱ्या मिळून वंजारी यांनी बाजी मारली आणि 67 हजार 231 मते घेणाऱ्या वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.

या निकालावर नितेश कराळे गुरूजी म्हणाले, "आमच्या बॅलेट पेपरवर अभिजीत वंजारी यांना जास्तीत जास्त मतदान होते. अभिजीत वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये. भाजपच्या विरोधात लोकांचा रोष असल्यामुळे दोन नंबरचे मत अभिजीत वंजारी यांना दिले गेले. भाजपने दोन नंबरचे मत मागितले नाही, हे त्यांच्यासाठी घातक ठरले."

कराळे गुरूजी पुढे म्हणाले, "त्यांनी दोन नंबर मागितले असते, तर माझ्या बॅलेटवर सारखेच दोन नंबर त्यांना असते. तर भाजपची सीट देखील येथे निवडून येण्याची शक्यता होती. हा निकाल नवीन अध्याय घेऊन महाराष्ट्रात आला आहे. तुम्ही जर एखाद्या काम करणाऱ्याची सीट डावलत असाल, तर लोक त्याला आपल्या मतदानातून प्रत्युत्तर देईल."

कराळे गुरूजी असेही म्हणाले, "विधानसभा लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. कराळे मास्तर कोण आहे याची आतापर्यंत दखल घेतली नाही, मात्र आता कराळे मास्तरची दखल घ्यावी लागेल."

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ