नागपुरात NCB ने ट्रकमधून पकडला 500 किलो गांजा, तिघांना अटक
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने लोखंडी पाइपच्या आड लपवलेला गांजा जप्त केला. मागे मोठे नेटवर्क असल्याचा पोलिसांना संशय आहे.
नागपुरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) मोठी कारवाई करून तब्बल 500 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
NCB ला गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचला आणि मुंबईकडून नागपुरात आलेला हा गांजा पकडला. मिळालेल्या माहितीनुसार, हा गांजा ओडिशातील संबलपूरहून नागपूरला आणला जात होता. तो ट्रकमध्ये लोखंडी पाइपच्या आड लपवून नेला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक केलेल्यांमध्ये ट्रकचा चालक, गांजा घेणारा आणि ड्रग्ज नेटवर्कमधील एक सहकारी अशा तिघांचा समावेश आहे. आरपी गोल्डर (RP Goldar) आणि ए. सरकार (A. Sarkar) हे दोघे पश्चिम बंगालमधील असून ते संशयित ट्रकमध्ये सापडले. नागपुरातील गांजा घेणारा SAS युसूफ उर्फ राजाभाई यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
नागपुरातून हा गांजा पुढे जालना आणि इंदूरमध्ये वितरित केला जाणार होता, अशी माहिती आहे. तपास यंत्रणांना चकवण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केल्याचेही सांगितले जाते. राजाभाई गेल्या 4-5 वर्षांपासून ड्रग्ज तस्करीत असून त्याच्यावर यापूर्वीही NDPS अंतर्गत प्रकरणे दाखल आहेत. आता या नेटवर्कमधील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. यामागे मोठे नेटवर्क असल्याचा पोलिसांना संशय आहे.
NDPS तस्करीविरोधात NCB ची कारवाई सुरूच आहे. यापूर्वी NCB ने नागपूर, गोंदिया आणि भंडारा येथे मिळून 1,156 किलोहून अधिक गांजा जप्त केला होता. या प्रकरणात आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
दुसरीकडे, मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने 11.774 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 4.12 कोटी रुपये असल्याचा दावा आहे. या प्रकरणी मोहम्मद सुहेल (वय 35) या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा कर्नाटकातील कारवार येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
3 ऑक्टोबरच्या रात्री ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे या प्रवाशाला तपासणीसाठी थांबवले. तो बँकॉकहून बटिक एअरच्या OD 215 विमानाने मुंबईत आला होता. त्याच्या अंगझडतीत कोणताही अमली पदार्थ सापडला नाही. मात्र चेक-इन बॅगेजमधील ROUTE 66 कंपनीच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली असता 12 प्लास्टिक पॅकेट्स सापडली. त्यात गांजा असल्याचा संशय आला आणि फील्ड टेस्टमध्ये हायड्रोपोनिक गांजाची पुष्टी झाली. जप्त गांजाचे एकूण वजन 11,774 ग्रॅम आहे.
आरोपीला 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता NDPS कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. गांजाच्या तस्करीसाठी पैसे मिळत असल्याचे आरोपीने जबाबात सांगितल्याचा दावा आहे. या तस्करीमागील इतर व्यक्ती आणि नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.