नागपुरात पाच वर्षांत 44,660 जणांना कुत्र्यांचा चावा; रेबीजने 8 जणांचा मृत्यू
नागपूर महानगरपालिकेच्या आकडेवारीत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे.
नागपुरात भटक्या कुत्र्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मनपाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2021 ते 2025 या पाच वर्षांत शहरात तब्बल 44 हजार 660 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. यापैकी 9 हजार 946 जण गंभीर जखमी झाले, तर याच काळात रेबीजमुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद मनपाकडे आहे. 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिन साजरा होत असताना ही आकडेवारी समोर आल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
वर्षनिहाय आकडेवारी पाहिली तर 2021 मध्ये कुत्रा चावल्याच्या 5,800 घटना नोंदवल्या गेल्या, त्यापैकी 1,484 जण गंभीर जखमी झाले. पुढच्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये हा आकडा वाढून 8,317 वर गेला आणि 2,134 जण गंभीर जखमी झाले. 2023 मध्ये 9,110 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला, त्यातले 1,877 जण गंभीर जखमी झाले. 2024 मध्ये 9,429 घटना घडल्या असून 1,841 नागरिक गंभीर जखमी झाले होते. म्हणजेच हा आकडा दरवर्षी थोड्याफार फरकाने वाढतच गेल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.
सर्वात जास्त घटना नोंदल्या गेल्या त्या 2025 मध्ये. या वर्षात 10,944 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यापैकी 2,173 जण गंभीर जखमी झाले. म्हणजेच गेल्या पाच वर्षांतला हा सर्वाधिक आकडा आहे आणि परिस्थिती दरवर्षी अधिकच बिकट होत असल्याचे यातून स्पष्ट होते. पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक चाव्याच्या घटना आणि सर्वाधिक गंभीर जखमी नागरिक 2025 मध्येच नोंदवले गेले, हे विशेष.
भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मनपाकडून नसबंदी मोहीम राबवली जाते. मनपाच्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत तीन संस्थांच्या मदतीने 69 हजार 386 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसबंदी होऊनही कुत्र्यांच्या हल्ल्यांचा आकडा खाली येत नसल्याने, भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन आणि नसबंदी मोहिमेची परिणामकारकता याबाबत प्रश्न उभे राहत आहेत. नसबंदी झालेल्या कुत्र्यांची संख्या मोठी असूनही चावण्याच्या घटनांचा आलेख वरच जात असल्याने ही मोहीम पुरेशी ठरत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसते.
शहरात फक्त कुत्रेच नाहीत, तर बंदरे, गाढवे आणि डुकरांच्या हल्ल्यांमुळेही नागरिक जखमी होत आहेत. मनपाच्या आकडेवारीनुसार या प्राण्यांच्या हल्ल्यांत 6 हजार 126 नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर मनपाच्या रुग्णालयांत उपचार करण्यात आले.
जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने 28 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमध्ये कुत्र्यांना मोफत रेबीज लस दिली जाणार आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके यांनी नागरिकांना रेबीजपासून बचावासाठी वेळेवर लसीकरण करून घ्यावे आणि आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन केले आहे.