नागपुरात महिलांची महापौर चषक टी-२० स्पर्धा सुरू, उद्घाटनानंतर महापौर निता ठाकरेंनी घेतली बॅट
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर महानगरपालिकेच्या महापौर चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला यशवंत स्टेडियमवर सुरुवात झाली असून ८ नोव्हेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेने महिला खेळाडूंसाठी 'महापौर चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा' भरवली आहे. महिला खेळाडूंमधील लपलेल्या क्रीडागुणांना वाव मिळावा आणि त्यांना उच्च स्तरावर खेळण्याची चांगली संधी मिळावी, हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या विशेष पुढाकारातून सुरू झालेली ही स्पर्धा शहरातील यशवंत स्टेडियम येथे ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर उपस्थित होते. त्यांच्यासोबत इतर अधिकारी आणि कर्मचारीही हजर होते.
उद्घाटनानंतर खेळाडूंना एक लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळाला. महापौर निता ठाकरे यांनी फक्त पूजा करून औपचारिकता उरकली नाही. त्या थेट मैदानात उतरल्या आणि हातात बॅट घेतली. इतर पदाधिकारी आणि खेळाडूंच्या समोर त्यांनी खेळपट्टीवर चेंडूवर जोरदार फटकेबाजी केली.
शिवानी दाणी वखरे, नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि दर्शनी धवड यांनीही गोलंदाजी व फलंदाजीची मजा घेतली. बोरकर यांनीदेखील जोरदार फटके मारले. महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांचा हा उत्साह आणि खेळाडूवृत्ती पाहून स्टेडियममधील महिला खेळाडू आणि प्रेक्षक खूश झाले. टाळ्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर महापौर आणि इतर पदाधिकारी काही वेळ सामन्याचा आनंद घेत बसले.
या कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते सामनावीर आरजू तिम्मा हिला पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत शहरातील ८ नामांकित महिला क्रिकेट संघांचे एकूण १२० खेळाडू सहभागी झाले आहेत. या संघांची अ आणि ब अशा दोन गटांत विभागणी केली आहे.
विजेत्या संघाला जेतेपदाचा चषक आणि १ लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ५१ हजार रुपये दिले जातील. याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठी सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असे पुरस्कार दिले जाणार आहेत. सामनावीर खेळाडूला सन्मानचिन्ह आणि रुपये २१०० मिळतील. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या प्रत्येकाला सन्मानचिन्ह आणि रुपये २१,०० दिले जाणार आहेत, असे जाहीर करण्यात आले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.