मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

बुटीबोरीत देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम, गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

अवादा समूहाच्या प्रकल्पाला भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना नागपुरात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

बुटीबोरीत देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम, गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नागपूर शहर पुढील दहा वर्षांत देशातील सोलर इकोसिस्टीमचे मोठे केंद्र म्हणून पुढे येणार आहे. देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम याच शहरात आकाराला येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उद्योजकांना या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवादा समूहाच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली आणि तेथे सुरू असलेल्या सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी केली. या भेटीनंतर त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. अवादा उद्योग समूहाचे संस्थापक व अध्यक्ष विनीत मित्तल यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची खास मुलाखत घेतली, ज्यात राज्यातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि मुंबईतील भविष्यातील बदल या विषयांवर चर्चा झाली.

नव्या नागपूर प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी आवश्यक इकोसिस्टीम उभी केली जात आहे. या प्रकल्पासाठी ठरवलेल्या जागेपैकी ५० टक्क्यांहून अधिक जागा आता अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही चालना मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल याच अतिरिक्त बुटीबोरी परिसरात उभे राहत आहे. अवादा समूहाला या प्रकल्पाच्या विस्तारासाठी २५० एकर जागा हवी असून ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी ताब्यात घेतलेली जमीन आता संपली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील नव्या औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

अवादा हा सोलर मॉडेल तयार करणारा देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या ठिकाणी अॅडव्हान्स इंटिग्रेशनच्या माध्यमातून स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे. भूमिपूजनानंतर हा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास गेला असून सध्या येथे पाच हजार कामगार काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

उद्योजकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी स्टील उद्योगाच्या विकासाला चालना देण्यात येत असल्याचे सांगितले. उद्योजकांना स्वस्त वीज कशी उपलब्ध करून देता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. २०२९ पर्यंत उद्योगांना स्वस्त वीज मिळेल असे त्यांनी सांगितले. सोलर बॅटरी स्टोरेजच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असून, त्याद्वारे चोवीस तास ऊर्जा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना विजेचा प्रश्न भेडसावणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गडचिरोली हे नवे स्टील सिटी म्हणून उदयाला येत असून तेथे चार लाख कोटींची गुंतवणूक आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गडचिरोलीत ग्रीन स्टील तयार करण्यासाठी बेल्जियमच्या एका कंपनीसोबत सामंजस्य करारही झाल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपुरात दिवसेंदिवस रस्ते आणि इतर सुविधा वाढत असल्याने बाहेरून येणारी गुंतवणूक शहरात वाढण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नव्या उद्योगांसाठी जमीन, वीज, पाणी आणि चांगली प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ