नागपूर पदवीधरसाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी निश्चित, भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरूच
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने अभिजित वंजारी यांची उमेदवारी निश्चित केली असून भाजपने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते वंजारी यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपने अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आणि पक्षात उमेदवारीसाठी चुरस सुरू आहे.
देशात नुकतेच झालेले कॉक्रोज जनता पक्षाचे आंदोलन आणि ज्ञानेश कुमार यांचे प्रकरण, याचा या निवडणुकीवर प्रभाव राहील, असे अभिजित वंजारी यांनी सांगितले. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचाच विजय होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ही सरकारची लिटमस टेस्ट आहे आणि राज्यातील जनता कोणाच्या बाजूने आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल, असेही वंजारी यांनी म्हटले आहे.
वंजारी हे 5 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. भाजपने उमेदवार जाहीर केलेला नसल्याने वंजारी यांच्याविरोधात भाजप कोणाला रिंगणात उतरवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे यांनी प्रचार सुरू केला आहे. उमेदवारी कोणालाही मिळो, भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणायचे आहे, असे कोहळे यांनी सांगितले. त्यासाठी आमची तयारी सुरू झाली असून आपणही प्रचाराला सुरुवात केली आहे, असे त्यांनी म्हटले. या प्रचारादरम्यान कोहळे यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या समजून घेतल्या.
दुसरीकडे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली असून संघ परिवारातील इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आयामचे विदर्भसह प्रांतप्रमुख ऍड. रमण सेनाड यांनी आपल्याला नागपूर पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
सेनाड यांनी सांगितले की, ते गेली पन्नास वर्षे संघ परिवाराचे काम करत आहेत आणि तीस वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहेत. अनेक वेळा उमेदवारी मागितली, पण पक्षाने तिकीट नाकारले, तरीही प्रामाणिकपणे पक्षाचे आणि संघाचे काम सुरू ठेवले, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री आपल्याबद्दल सकारात्मक आहेत आणि यावेळी उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे, असेही सेनाड यांनी सांगितले.
भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस रंगली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यात भाजप कोणावर आपला डाव लावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.