नागपूर विमानतळावर आता बोर्डिंग पास स्कॅन न करताच प्रवेश, डिजी यात्रा प्रणालीत मोठा बदल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने डिजी यात्रा प्रणाली अपग्रेड केली असून आता प्रवाशांना गेटवर बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार नाही.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा करण्यासाठी जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 'डिजी यात्रा' प्रणाली अपग्रेड केली आहे. नागपूर विमानतळावरील प्रवाशांची यात्रा अधिक चांगली करण्यासाठी जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावरील सर्व डिजी यात्रा सक्षम प्रवेशद्वारांवर आता 'सिंगल स्टेप फेस रिकग्निशन' तंत्रज्ञान यशस्वीरित्या सुरू करण्यात आले आहे.
या नव्या तंत्रज्ञानामागचा मुख्य हेतू म्हणजे प्रवाशांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय, कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय आणि वेळ न दवडता विमानतळावर झटपट व सुरळीत प्रवेश देणे.
आतापर्यंत नागपूर विमानतळावर सुरू असलेल्या व्यवस्थेनुसार प्रवाशांना डिजी यात्रा अॅपवर रजिस्ट्रेशन करून त्यात बोर्डिंग पास जोडावा लागत असे. विमानतळावर पोहोचल्यावर डिजी यात्रा प्रवेशद्वारावर प्रवाशांना आधी आपला बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन करावा लागायचा. त्यानंतर तिथे बसवलेला कॅमेरा प्रवाशाचा चेहरा ओळखत असे आणि तेव्हा कुठे गेट उघडत असे. म्हणजेच आधीच्या व्यवस्थेत प्रवाशाला दोन टप्पे पार करावे लागत होते, आधी स्कॅनिंग आणि नंतर चेहऱ्याची ओळख पटवणे.
आता मात्र प्रवाशाने डिजी यात्रा अॅपवर रजिस्ट्रेशन करून आपला बोर्डिंग पास अॅपमध्ये शेअर करायचा आहे. नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर प्रवाशाला गेटवर बोर्डिंग पास स्कॅन करण्याची अजिबात गरज भासणार नाही. प्रवासी डिजी यात्रा गेटसमोर उभा राहताच कॅमेरा केवळ चेहरा ओळखून प्रवाशाची ओळख पटवेल आणि ई-गेट आपोआप उघडेल. म्हणजे आता संपूर्ण प्रक्रिया एकाच टप्प्यात, फक्त चेहरा ओळखून पूर्ण होणार आहे.
जीएमआर नागपूरचे सीईओ श्रीकांत भंडारकर यांनी सांगितले की, नागपूर विमानतळावर प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद आणि सुरळीत बनवणे ही आमची प्राथमिकता आहे. डिजी यात्रा प्रणालीत सिंगल स्टेप फेस रिकग्निशन सुविधा जोडणे हा याच दिशेने टाकलेला एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भंडारकर पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष माणसांचा हस्तक्षेप कमी करून आणि पडताळणी प्रक्रिया सोपी करून आम्ही आमच्या प्रवाशांना अत्यंत कार्यक्षम, सुरक्षित आणि संपर्करहित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत.
या व्यवस्थेच्या अपग्रेडमुळे प्रवेशद्वारावर बोर्डिंग पास स्कॅन करण्याचा टप्पाच संपुष्टात येणार असल्याने एंट्री गेट्सवरील रांगा आणि प्रतीक्षा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रवाशांना आपला फोन किंवा तिकीट वारंवार गेटच्या स्कॅनरला टेकवण्याची किंवा कागदपत्रे दाखवण्याची गरज उरणार नाही. यामुळे विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून सुरक्षा तपासणी क्षेत्रापर्यंत पोहोचण्यात प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.