मलिंगा, म्हांब्रे आणि हॉपकिंसन मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमधून बाहेर
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आयपीएल 2027 आधी मुंबई इंडियन्सच्या कोचिंग सेटअपमध्ये आणखी बदल झाले आहेत. लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिंसन यांची भूमिका संपली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या कोचिंग सेटअपमध्ये बदल सुरूच आहेत. पाच वेळचा गतविजेता असलेल्या या संघाच्या कोचिंग स्टाफमधून आता लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिंसन हेही बाहेर पडले आहेत. ही माहिती मुंबई इंडियन्सनेच गुरुवारी दिली.
फ्रँचायझीने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, पुरुष संघाच्या कोचिंग सेटअपमधील आपापल्या भूमिकेतून हे तिघे मुक्त होत आहेत. त्यांनी फ्रँचायझीसाठी दाखवलेली वचनबद्धता, दिलेले योगदान आणि केलेल्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही त्यात म्हटले आहे.
मलिंगा हा मुंबई इंडियन्स कुटुंबातला महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. फ्रँचायझीच्या इतिहासातल्या सर्वात आयकॉनिक लोकांपैकी तो एक आहे. एमआयच्या बॉलिंग अटॅकचे नेतृत्व करणे, चार आयपीएल जेतेपदे जिंकणे आणि 2011 च्या चॅम्पियन्स लीग टी-20 मधल्या विजयात मोलाची भूमिका बजावणे, हे सगळे त्याच्या नावावर आहे. मेंटर म्हणून आणि नंतर प्रशिक्षक म्हणून संघात परतण्यापर्यंतचा त्याचा एमआयसोबतचा प्रवास खास राहिला. त्याची झुंजार वृत्ती, प्रतिस्पर्ध्याशी भिडण्याची भावना आणि संघाबद्दलची बांधिलकी यांनी अनेक पिढ्यांतील खेळाडूंना प्रेरणा दिली. त्याचा वारसा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग म्हणून कायम राहील, असे फ्रँचायझीने म्हटले आहे.
पारस म्हांब्रे यांचेही मुंबई इंडियन्ससोबत लांब आणि मोलाचे नाते राहिले आहे. आधी 2010 ते 2017 पर्यंत ते संघात होते आणि त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा एमआयमध्ये आले. दोन्ही वेळा ते भरपूर अनुभव आणि क्रिकेट संस्कृतीतल्या बारकाव्यांची समज घेऊन आले होते. संघातल्या नव्या गोलंदाजांना घडवण्यात आणि त्यांचा खेळ सुधारण्यात म्हांब्रे यांच्यासारखे कोणीच नव्हते. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे.
कार्ल हॉपकिंसन 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये आला. इंग्लंडच्या पुरुष संघातला महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊनच तो फ्रँचायझीत दाखल झाला होता. संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यात त्याचा मोठा वाटा होता. व्यावसायिक भूमिका, विशेष कौशल्य आणि बांधिलकी या बाबतीत तो फ्रँचायझीसोबत चांगला जुळला होता, असेही सांगितले गेले.
एमआयच्या व्यवस्थापनाने या तिघांचे आभार मानले. एमआय कुटुंबाकडून लसिथ, पारस आणि कार्ल यांचे मनापासून आभार. त्यांनी फ्रँचायझीच्या प्रवासात नेहमीच मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासोबतचे नाते आणि आठवणी आमच्या फ्रँचायझीचा नेहमीच भाग राहतील. त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी आम्ही शुभेच्छा देतो, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. मुंबई इंडियन्समध्ये लसिथ मलिंगा आणि पारस म्हांब्रे गोलंदाजी प्रशिक्षक होते, तर कार्ल हॉपकिंसन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करत होता.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.