काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध चंद्रपुरात तक्रार, मोदींच्या AI फोटोवरून वाद
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या फेसबुक पेजवरील पंतप्रधान मोदींच्या कथित AI फोटोवरून चंद्रपुरात तक्रार, आमदार मुनगंटीवार यांची पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी
चंद्रपुरातील वकील ॲड. योगेश्वर पचारे यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत आणि सत्यापित फेसबुक पेजवर १० सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेला आक्षेपार्ह फोटो टाकण्यात आला होता, असा आरोप या तक्रारीत आहे.
ॲड. पचारे यांच्या म्हणण्यानुसार, या फोटोत पंतप्रधानांच्या हातात भिकेची वाटी दाखवण्यात आली होती आणि त्याखाली अवमानकारक मजकूरही लिहिलेला होता. राजकीय टीकेच्या नावाखाली एआयचा गैरवापर करून देशाच्या पंतप्रधानांसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदाची आणि पंतप्रधान कार्यालयाची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपानुसार, हर्षवर्धन सपकाळ आणि संबंधित सोशल मीडिया पेजच्या व्यवस्थापकांविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ॲड. पचारे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' या तक्रार निवारण पोर्टलवर १२ सप्टेंबर रोजी गृह विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीचा टोकन क्रमांक COM/HOMD/2026/2331 असा आहे. गृह सचिवांच्या निर्देशानंतर ही तक्रार पुढील तपासासाठी चंद्रपूरच्या सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २७ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना पत्र लिहिले. संबंधित फेसबुक पोस्ट, त्यातील मजकूर आणि जोडलेल्या पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. डिजिटल पुराव्यांची पडताळणी करून ही पोस्ट तयार करणाऱ्या, ती पसरवणाऱ्या आणि यामागे जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित करावी, असेही आमदार मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS मधील बदनामी आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या तरतुदी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणीही त्यांनी याच पत्रातून केली आहे.
पंतप्रधानांच्या या कथित अवमानकारक फोटोवरून राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे समजते. चंद्रपूर पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि डिजिटल स्रोतांची सखोल तपासणी करत असल्याची माहिती आहे. हा फोटो नेमका कोणी तयार केला आणि तो कोणामार्फत पसरवण्यात आला, याचा शोध घेण्यावर तपासाचा भर असल्याचे दिसते.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.