गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? कारण जाणून घ्या
सण असो वा साधा दिवस, गोड खाल्ल्यावर लगेच सुस्ती किंवा झोप का येते, यामागचं शास्त्रीय कारण काय आहे ते जाणून घेऊया.
सण असो वा साधा दिवस, गोड खाल्ल्याशिवाय अनेकांचं मन भरत नाही. मिठाई असो किंवा चॉकलेट, गोड पदार्थ खाल्ल्यावर बऱ्याच जणांना काही वेळातच डोळ्यांवर झापड येते किंवा एकदम आळस वाटायला लागतो. हे नेमकं का घडतं, यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं. आपल्यापैकी बहुतेकांना गोड खाण्याची खूप आवड असते, आणि प्रत्येक सणासुदीला आपण गोड मिठाई किंवा चॉकलेट खात असतो. पण गोड खाल्ल्यावर आपल्याला लगेच झोप किंवा आळस का येतो, याचं उत्तर शास्त्रीय कारणांमध्ये दडलेलं आहे.
गोड पदार्थ खाल्ल्यावर शरीरातील साखरेचं म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण अचानक वाढतं. आपण गोड पदार्थ खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढलेली असते. रक्तातील ही वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यासाठी स्वादुपिंड मोठ्या प्रमाणात इन्सुलिन हा संप्रेरक सोडतं. हे इन्सुलिन रक्तातील साखर वेगाने कमी करतं. साखरेची पातळी अशी अचानक खाली आल्यामुळे शरीरातील ऊर्जा एकदम घटते आणि त्यामुळेच थकवा किंवा झोप जाणवायला लागते. इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत फूड क्रोमा असं म्हटलं जातं.
या प्रक्रियेमागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे शरीरातील अमिनो ॲसिड आणि मेंदूतील संप्रेरकांचा खेळ. इन्सुलिनच्या प्रभावामुळे रक्तातील अमिनो ॲसिड स्नायूंमध्ये शोषलं जातं, पण ट्रायप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड मात्र मेंदूपर्यंत पोहोचतं. मेंदूत पोहोचल्यावर या ट्रायप्टोफॅनचं रूपांतर सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या दोन संप्रेरकांमध्ये होतं. ही दोन्ही संप्रेरकं शरीराला शांत करण्याचं आणि झोप आणण्याचं काम करतात.
याशिवाय मेंदूत ओरेक्सिन नावाच्या पेशी असतात, ज्या शरीराला जागं आणि सतर्क ठेवण्याचं काम करतात. शरीरातील साखरेचं प्रमाण वाढलं की या ओरेक्सिन पेशींचं काम मंदावतं, आणि त्यामुळे माणसाला सुस्ती येते.
तिसरं कारण म्हणजे पचनसंस्थेकडे वळणारा रक्तप्रवाह. गोड किंवा जड पदार्थ खाल्ल्यावर ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहाचा मोठा हिस्सा पोट आणि आतड्यांकडे वळवला जातो. परिणामी काही काळासाठी मेंदू आणि इतर अवयवांकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, आणि त्यामुळेही आळस जाणवतो.
यासाठी शरीराच्या शारीरिक वाढीवर नियंत्रण ठेवणं, पचनक्रियेकडे लक्ष देणं आणि ताणतणावासह भावनिक समतोल सांभाळणं गरजेचं असतं.
गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण त्याचं प्रमाण किती ठेवायचं यावर नियंत्रण असणं महत्त्वाचं आहे. आहारात प्रोटीन, फायबर आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास जेवण अधिक संतुलित राहण्यास मदत होते. तसंच गोड खाल्ल्यानंतर थोडा वेळ हलकं चालणंही उपयोगी ठरू शकतं.