मिरा रोडमध्ये मेट्रो ब्रिजच्या कामादरम्यान सिमेंट ब्लॉक कोसळला, तरुण गंभीर जखमी
काशिमीरा भागात मेट्रो ब्रिजखालच्या बांधकामातून सिमेंटचा ब्लॉक अंगावर कोसळल्याने २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मेट्रो ब्रिजखाली सुरू असलेल्या बांधकामादरम्यान सिमेंटचा मोठा ब्लॉक अचानक खाली कोसळला आणि त्याखाली येऊन एक २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना काशिमीरा येथील अक्षित बारसमोर घडली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
शादाब असे या जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शादाब रस्ता ओलांडत असताना त्याच्या मोबाइलवर फोन आला. फोनवर बोलण्यासाठी तो काही क्षण रस्त्याच्या मध्यभागी थांबला. नेमकं याचवेळी मेट्रो ब्रिजच्या कामाच्या ठिकाणाहून सिमेंटचा मोठा ब्लॉक खाली येऊन थेट त्याच्या डोक्यावर आदळला. या धक्क्याने शादाब जागीच रस्त्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला.
दुखापतीनंतर शादाब जवळपास तासभर त्याच जागी रस्त्यावर पडून होता, असे सांगण्यात येते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांमुळे तो जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना पटकन दिसला नाही. काही वेळाने एका व्यक्तीचे त्याच्याकडे लक्ष गेल्यावर तातडीने मदतीची धावपळ सुरू झाली. रिक्षाच्या मदतीने त्याला मिरा रोड येथील वोखहार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सिमेंटचा ब्लॉक थेट डोक्यावर आदळल्यामुळे शादाबला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वोखहार्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर शादाबच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शादाब रस्त्यावर असताना अचानक वरून एखादी वस्तू कोसळल्याचे स्पष्टपणे दिसते. या घटनेमुळे मेट्रो ब्रिजखाली सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेतली जात होती का, हा प्रश्न उभा राहिला आहे. काम सुरू असताना खालच्या रस्त्यावरून पादचारी आणि वाहनांची सतत ये-जा असल्याने बांधकाम साहित्य खाली पडू नये यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे असते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याआधीही या भागात बांधकाम साहित्य आणि लोखंडी वस्तू खाली पडल्याचे प्रकार घडले आहेत, मात्र या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता सिमेंटचा ब्लॉक कोसळून एक तरुण गंभीर जखमी झाल्याने कामाच्या जागेवरील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, सिमेंटचा ब्लॉक का कोसळला आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था होती की नाही, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे. संबंधित यंत्रणांकडून याबाबत अधिकृत खुलासा आल्यानंतरच घटनेचे नेमके कारण समोर येऊ शकेल. दरम्यान, गंभीर जखमी शादाबवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देण्याची तयारी केली आहे. पुढे पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.