मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:47 IST

रामलीला गार्डनमध्ये आता नियमित पोलीस गस्त; महिलांच्या सुरक्षेच्या तक्रारींची दखल

मीरा-भाईंदरमधील नवघर परिसरातील रामलीला गार्डनमध्ये गैरप्रकार आणि अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा वावर वाढल्यानंतर पोलिसांनी पाहणी करून नियमित गस्तीची कार्यवाही सुरू केली आहे.

रामलीला गार्डनमध्ये आता नियमित पोलीस गस्त; महिलांच्या सुरक्षेच्या तक्रारींची दखल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मीरा-भाईंदरमधील नवघर परिसरात असलेल्या रामलीला गार्डनमध्ये आता पोलिसांची नियमित गस्त ठेवली जाणार आहे. गार्डनमध्ये वाढलेले गैरप्रकार, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा वावर आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न मांडला गेल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. पोलिसांनी गार्डनची पाहणी केली असून, परिसरात नियमित गस्त ठेवण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ गार्डनमध्ये येणाऱ्या महिला आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

गेल्या काही दिवसांपासून या गार्डनमध्ये नशेचे पदार्थ घेणाऱ्या व्यक्तींचा आणि गर्दुल्यांचा वावर वाढल्याची तक्रार स्थानिक महिला करत होत्या. सकाळी आणि संध्याकाळी योग, व्यायाम किंवा फेरफटका मारण्यासाठी गार्डनमध्ये येणाऱ्या महिलांना त्यामुळे भीतीच्या वातावरणात वावरावे लागत होते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी प्रकाशव्यवस्था अपुरी असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जास्तच गंभीर झाला होता.

गार्डनमधील काही दिव्यांची तोडफोड करण्यात आल्याचे आणि लोखंडी ग्रील कापून नेल्याचेही निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेविका वंदना पाटील यांनी महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. या पत्रांमधून त्यांनी गार्डनमध्ये उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, स्थानिक महिलांनी शिवसेना शहरप्रमुख सचिन मांजरेकर यांच्याकडेही आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर मांजरेकर यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून गार्डनमधील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गार्डनमध्ये जाऊन पाहणी केली.

पोलिसांनी गार्डन परिसरात नियमित गस्त वाढवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. इतकेच नाही, तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे गार्डनमधील गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, वंदना पाटील यांच्या पुढाकाराने गार्डनमधील तुटलेल्या ग्रील आणि स्लायडिंगच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. पोलिसांची नियमित गस्त, दुरुस्तीची कामे आणि प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या गेल्यास रामलीला गार्डन पुन्हा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित ठिकाण बनेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ