McDonald's चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग
जास्त प्रोटीन, कमी पोर्शन आणि कमी साखर असलेले जेवण शोधणाऱ्या ग्राहकांसाठी McDonald's नवे पदार्थ चाचणीत आणत आहे.
फास्ट फूडची आठवण झाली की डोळ्यासमोर येतात बर्गर, फ्राइज आणि थंड पेय. फास्ट फूड म्हटले की सर्वसाधारणपणे हेच पदार्थ आठवतात. पण ग्राहकांच्या खाण्याच्या सवयी हळूहळू बदलत असल्याने McDonald's आता आपल्या मेन्यूत प्रोटीनला जास्त महत्त्व देणारे नवे पदार्थ आणण्याच्या तयारीत आहे. जास्त प्रोटीन, कमी पोर्शन आणि कमी साखर असलेले जेवण शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सध्या वेगवेगळ्या पदार्थांची चाचणी घेत आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीत लेट्यूस, चीज, टोमॅटो आणि रँचसोबत दिला जाणारा Crispy Chicken Bowl, तसेच Grilled Chicken Snack Wrap यांचा समावेश आहे. याशिवाय Burger Bowl हा पर्यायही चाचणीत आहे, ज्यात नेहमीच्या बन किंवा ब्रेडऐवजी बर्गर बाऊलच्या स्वरूपात दिला जाणार आहे. म्हणजेच नेहमीच्या पावाच्या जागी बाऊलमध्ये हे जेवण दिले जाईल. नाश्त्यासाठी Egg Bites हा पर्यायही चाचणीत असल्याचे कंपनीने सांगितले.
या बदलामागचे एक कारण म्हणजे GLP-1 औषधांचा वाढता वापर. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही औषधे घेणाऱ्या काही ग्राहकांना आता मोठे कॉम्बो मील किंवा साखरयुक्त पेय नको असते, त्याऐवजी ते कमी प्रमाणात पण प्रोटीन असलेले पदार्थ पसंत करतात. McDonald's ने सांगितले की अमेरिकेत GLP-1 वापरणारे असलेल्या सुमारे 84 टक्के कुटुंबांकडून कंपनीच्या रेस्टॉरंटला भेट दिली जाते. यातील अनेक ग्राहक सध्या Happy Meal, Filet-O-Fish आणि McNuggets सारखे आधीपासून मेन्यूत उपलब्ध असलेले पदार्थ निवडत आहेत.
McDonald's ने आधीच अमेरिकेत आपल्या काही पदार्थांमधील प्रोटीनचे प्रमाण स्पष्टपणे दाखवायला सुरुवात केली आहे. एप्रिल 2026 मध्ये कंपनीने 17 मेन्यू आयटमसाठी प्रोटीन कॉलआउट्स सुरू केले होते, म्हणजे या पदार्थांत नेमके किती प्रोटीन आहे हे कंपनीने मेन्यूवर दाखवायला सुरुवात केली. कंपनीने नमूद केल्यानुसार, Egg McMuffin मध्ये 17 ग्रॅम प्रोटीन असते, तर 10 पीस Chicken McNuggets मध्ये 23 ग्रॅम प्रोटीन असते.
सध्या हे सगळे पदार्थ चाचणी आणि विकासाच्या टप्प्यावर आहेत. यातील कोणते पदार्थ अखेर मेन्यूत कायमस्वरूपी येतील आणि त्यांचे लॉन्चिंग नेमके कधी होईल, याची निश्चित तारीख McDonald's ने अजून जाहीर केलेली नाही. ही चाचणी प्रामुख्याने अमेरिकन बाजारासाठी सुरू असल्याने हेच पदार्थ भारतातही येतील, असे सध्या ठामपणे सांगता येणार नाही.
दरम्यान, भारतात McDonald's कडे आधीपासूनच काही प्रोटीन-केंद्रित पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर सुरू असलेल्या या नव्या प्रयोगांचा भारतीय मेन्यूवर पुढे काय परिणाम होतो, याकडे इथल्या ग्राहकांचेही लक्ष असेल.