गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

देशात एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्नाचे वैयक्तिक करदाते फक्त ३.२४ लाख, आयकर आकडेवारी

देशात एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्नाचे वैयक्तिक करदाते फक्त ३.२४ लाख, आयकर आकडेवारी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
व्यवसाय PT24 टीम

मार्च २०२५ पर्यंतच्या आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेले वैयक्तिक करदाते ३.२४ लाख आहेत.

देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संख्या आणि त्यांची कमाई, दोन्ही वेगाने वाढत आहेत. मात्र भारताच्या सुमारे १४० कोटी लोकसंख्येपैकी सात आकडी उत्पन्न मिळवणारे किती, याचे उत्तर आयकर विभागाच्या अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. मार्च २०२५ पर्यंत एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या वैयक्तिक करदात्यांची नोंद फक्त ३.२४ लाख इतकी आहे. गेल्या दहा वर्षांत एक कोटीपेक्षा जास्त कमावणाऱ्यांची संख्या सतत वाढत आली आहे.

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत देशात एकूण ९.१९ कोटी आयटीआर (ITR) भरले गेले. नोंदणी केलेल्या १४.१ कोटी वापरकर्त्यांपैकी हे रिटर्न जमा झाले आहेत. ३.२४ लाख वैयक्तिक करदात्यांपैकी २.९७ लाख जणांचे उत्पन्न १ ते ५ कोटींच्या दरम्यान आहे. या गटातील करदात्यांपैकी ५३ टक्के लोक वेतनदार आहेत.

५ ते १० कोटींच्या गटात १६,७९७ वैयक्तिक करदाते येतात, तर १० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेले वैयक्तिक करदाते १०,१८४ आहेत. फक्त वैयक्तिक करदातेच नव्हे, तर कंपन्या, फर्म, ट्रस्ट, एचयूएफ (HUF) आणि सरकारी संस्थाही धरल्या, तर एक कोटीहून अधिक उत्पन्न घोषित करणाऱ्या एकूण रिटर्न्सची संख्या ४.६८ लाखांपर्यंत जाते.

गेल्या दशकात म्हणजे २०१३-१४ ते २०२५ या काळात करदात्यांच्या आकडेवारीत मोठा बदल झाला आहे. असेसमेंट इयर २०१३-१४ मध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न (Taxable Income) असलेले फक्त ४४,०७८ लोक होते. गेल्या १० वर्षांत ही संख्या जवळपास ५ पटीने वाढली आहे.

२०१३-१४ मध्ये रिटर्न भरणारे वैयक्तिक करदाते ३.३ कोटी होते. ही संख्या २०२३-२४ मध्ये वाढून ७.५४ कोटींवर पोहोचली. आणखी एका अहवालानुसार, ५० लाख ते १ कोटी उत्पन्नाच्या गटात या दहा वर्षांत ४४० टक्क्यांची मोठी वाढ दिसली. हा आकडा २०१३-१४ मधील १.९ लाखांवरून ५.८२ लाख झाला. २० लाख ते ५० लाख उत्पन्नाच्या गटात ५२६.५% ची वाढ नोंदवली गेली आहे.

अतिश्रीमंतांचीही आकडेवारी समोर आली आहे. असेसमेंट इयर २०२३-२४ मध्ये २३ वैयक्तिक करदात्यांनी आपले वार्षिक उत्पन्न ५०० कोटींपेक्षा जास्त घोषित केले. १०० ते ५०० कोटी उत्पन्नाच्या गटातील २६३ करदात्यांपैकी फक्त १९ जण वेतनदार होते. याशिवाय १० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या वेतनदार करदात्यांच्या संख्येत ४.७ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

#नागपूर#कारोबार#PT24#Business#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ