माणगाव नगरपंचायतीत १५८ कोटींची भुयारी गटार योजना १० विरुद्ध ६ ने मंजूर, विरोधकांचा आक्षेप
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जागतिक बँक सहाय्यित योजनेच्या ठरावावरून माणगाव नगरपंचायतीची विशेष सभा वादळी ठरली. विरोधी नगरसेवक रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.
माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत भुयारी गटार योजना राबवायची की नाही, यावरून गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. ही योजना जागतिक बँकेच्या सहाय्याने एमयुडब्लूआरइपी अंतर्गत राबवली जाणार आहे. त्यासाठी निर्णय घ्यायला नगरसेवक आणि नगरसेविकांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी ही सभा बोलावली होती.
या योजनेसाठी १५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजना नगरपंचायत हद्दीत सगळीकडे राबवायची असेल, तर नगरपंचायतीने बहुमताने ठराव घेणे आवश्यक होते. म्हणून याआधी २७ ऑगस्ट रोजी नगरसेवक आणि नगरसेविकांची पहिली सभा बोलावण्यात आली होती.
गुरुवारच्या सभेत ठरावाबाबत बोलताना नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी, ज्या नगरसेवकांना ही योजना मंजूर आहे त्यांनी बोट वर करावे, असे सांगितले. त्यानंतर १० विरुद्ध ६ मतांनी योजना मंजूर करण्यात आली. मात्र सभेला हजर असलेल्या विरोधी गटाच्या नगरसेवक आणि नगरसेविकांनी ही सभा नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेतला. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शर्मिला सुर्वे यांनी सांगितले, की लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यामुळे विकासकामांना आपण कधीच विरोध करणार नाही आणि ही योजना नगरपंचायतीत राबवायची आहे. त्यावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद यादव यांनी आक्षेप घेतला. आमचा विकासकामांना कोणताही विरोध नाही, असे ते म्हणाले.
यादव म्हणाले, की भुयारी गटार योजना झाली पाहिजे, या मताचे आम्हीही आहोत. मात्र ऑगस्ट महिन्यातल्या नगरपंचायतीच्या सभेत ही योजना सर्वानुमते रद्द करण्यात आली होती. मग त्यानंतर असे काय घडले, की दोन महिन्यांनी पुन्हा सभा घ्यावी लागली, असा सवाल त्यांनी केला. ही सभा नियमबाह्य आणि अवैध आहे, असेही ते म्हणाले.
पैशांचा मुद्दाही यादव यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, योजनेसाठी सुरुवातीला ५ टक्के रक्कम, म्हणजेच जवळपास ७ कोटी रुपये, नगरपंचायतीला भरायचे आहेत. या योजनेमुळे नगरीतील ग्रामस्थांवर कर बसणार आहे. सध्या नगरपंचायतीची आर्थिक अवस्था बिकट आहे. लाईटबील भरायला आणि कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला नगरपंचायतीकडे पैसे नाहीत, असे ते म्हणाले.
या सभेला नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष रिया उभारे, आनंद यादव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार, पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, नगरसेवक कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, राजेश मेहता, सचिन बोंबले, प्रशांत साबळे, नगरसेविका ममता थोरे, रश्मी मुंढे, सुशीला वाढवळ, लक्ष्मी जाधव, सुविधा खैरे, हर्षदा सोंडकर, स्वीकृत नगरसेवक विश्वजित जाधव, विठोबा पालकर आणि मुख्याधिकारी संतोष माळी आदी उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.