सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

जैश-ए-मोहम्मदशी संबंधाच्या आरोपावरून माहीममधून एकाला अटक, महाराष्ट्र एटीएसची कारवाई

मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला माहीम मेट्रो स्टेशनजवळून अटक झाली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

जैश-ए-मोहम्मदशी संबंधाच्या आरोपावरून माहीममधून एकाला अटक, महाराष्ट्र एटीएसची कारवाई छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील माहीम परिसरात कारवाई केली. या कारवाईत मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (३३ वर्षे) याला माहीम मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या लक्ष्मी बिल्डिंग येथून अटक करण्यात आली.

एटीएसच्या माहितीनुसार, अख्तरच्या मोबाईलमध्ये प्रक्षोभक पोस्ट, जिहादचे समर्थन करणारे संदेश आणि मसूद अझरच्या ऑडिओ क्लिप सापडल्या आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये मसूद अझरचे कॉल रेकॉर्ड आणि भाषणेही आढळली, त्यामुळे एटीएसने त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अख्तर हा मूळचा बिहारचा आहे आणि गेली १० वर्षे मुंबईत राहत आहे. माहीम परिसरातील 'बाबा फालुदा' जवळ तो अत्तर विकण्याचे काम करायचा आणि त्यासोबतच 'रॅपिडो' या बाईक टॅक्सी कंपनीसाठी रायडर म्हणून काम करत होता.

हे काम करत असताना तो कट्टरपंथी विचारधारा पसरवत होता, असे एटीएसचे म्हणणे आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मोबाईल फोनमध्ये देशविरोधी साहित्यही सापडले आहे.

तो एक टेलिग्राम ग्रुप चालवत होता. त्या ग्रुपद्वारे त्याने १ जून २०२६ रोजी मौलाना मसूद अझरची प्रक्षोभक भाषणे पसरवली होती. त्याचबरोबर तो पाकिस्तान-समर्थित 'इब्न-ए-कासिम' चॅनेलवरही सक्रिय होता, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसकडून मिळाली आहे.

मुंबई एटीएसच्या काळाचौकी युनिटने अख्तरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम धर्म किंवा भाषा यांसारख्या कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याशी आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याशी संबंधित प्रकरणांना लागू होते.

शुक्रवारी न्यायालयाने आरोपी मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला पोलीस कोठडी सुनावली. एटीएस सध्या त्याचा मोबाईल फोन, सोशल मीडियावरील हालचाली आणि टेलिग्राम ग्रुपमधील त्याचा सहभाग यांची चौकशी करत आहे.

मसूद अझर हा कुख्यात दहशतवादी असून त्याचे नाव भारतातील अनेक दहशतवादी प्रकरणांशी जोडलेले आहे. 'जैश'चा प्रमुख असलेल्या मसूद अझरला १९९४ मध्ये जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अटक करण्यात आली होती. डिसेंबर १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला निघालेले इंडियन एअरलाईन्सचे विमान (IC-814) हायजॅक करून अफगाणिस्तानातील कंधारला नेण्यात आले होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ