महावितरणचा इशारा: वीजकामांसाठी खासगी माणसे वापरल्यास कर्मचाऱ्यांची थेट बडतर्फी
महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रक काढून अनधिकृत मनुष्यबळाच्या वापराविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर/गडचिरोली : महावितरणच्या वीजयंत्रणेतील कामे खासगी किंवा अनधिकृत माणसांकडून करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीसारखी कठोर कारवाई होणार आहे. तसे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली किंवा मीटर काढणे अशी कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करण्याची पूर्ण जबाबदारी तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहे. अशा तांत्रिक आणि जोखमीच्या कामांसाठी कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळ वापरू नये, असे सांगण्यात आले आहे.
संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी नुकतेच याबाबत परिपत्रक काढले आहे. क्षेत्रीय मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंते यांना त्यांनी खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणची वीज वितरण यंत्रणा सुरक्षितपणे चालवणे, तिची देखभाल व दुरुस्ती करणे आणि ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडवणे हे प्रत्येक संबंधित अभियंत्याचे आणि तांत्रिक कर्मचाऱ्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. प्रत्यक्ष कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गात प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ नेमलेले आहेत. नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीतला बिघाड शोधणे, वीजपुरवठ्याच्या ग्राहक तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसुली करणे आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे ही कामे त्यांच्यावर सोपवलेली आहेत.
मात्र काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः न करता खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तक्रारी मुख्यालयस्तरावर मिळाल्या आहेत. हे अत्यंत गंभीर आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. अशा माणसांकडे पुरेसे तांत्रिक ज्ञान आणि सुरक्षेचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे विद्युत व यांत्रिक अपघात होऊन ती खासगी माणसे तसेच कर्मचारी यांना इजा होण्याची मोठी शक्यता असते. शिवाय वीज ग्राहक आणि महावितरणच्या मालमत्तेचेही नुकसान सोसावे लागते.
कायद्याचा संदर्भही परिपत्रकात दिला आहे. 'सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स २०२३' मधील नियम ३ नुसार फक्त अधिकृत व्यक्तीच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करू शकते, तसेच विद्युत वाहिन्या आणि उपकरणांवर काम करण्यास तीच पात्र असते. त्यामुळे महावितरणने अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीला वीज यंत्रणेवर काम करू देणे, अथवा तिच्याकडून काम करून घेणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि अनधिकृत कृत्य आहे. महावितरणच्या सेवाविनियमांनुसार ही अत्यंत गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक ठरते.
या सगळ्याची दखल घेऊन श्री. औंढेकर यांनी परिपत्रकाद्वारे कठोर निर्देश दिले आहेत. अनधिकृत मनुष्यबळ वापरून काम केल्याचे, किंवा अशा गैरवर्तणुकीमुळे कोणतीही दुर्घटना, अपघात वा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळले, तर त्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले आहे. चौकशीत दोषी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सेवाविनियमातील तरतुदींनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंते यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाच्या कामांत कुठल्याही परिस्थितीत खासगी व अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही ना, याची वेळोवेळी खातरजमा करावी, असेही आदेश श्री. धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.