Police Recruitment: खाकीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात 8100 पोलिसांची बंपर भरती; कधी करता येणार
राज्यातल्या 8,100 पोलीस अंमलदार पदांच्या भरतीची तयारी गृह मंत्रालयाने सुरू केली असून, अर्जाचं वेळापत्रकही समोर आलं आहे.
पोलीस खात्यात नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातल्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाने पोलीस भरतीच्या हालचाली वेगाने सुरू केल्या असून, राज्यात 8,100 पोलीस अंमलदारांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. या नव्या भरतीमुळे राज्यातल्या हजारो तरुणांचं पोलीस दलात दाखल होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
गृह मंत्रालयाने जून 2027 पर्यंत रिक्त होणाऱ्या सर्व पोलीस अंमलदार पदांची सविस्तर माहिती मागवली आहे. या पदांची यादी तयार करून घेतल्यानंतर त्या आधारावर पुढची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजे 2027 मध्ये ही भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या राज्य शासनाकडून पोलीस भरतीची प्रक्रिया सातत्याने राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षी नियमितपणे मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होत आहे. या चालू वर्षातच 15,631 पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी म्हणजे 2027 मध्येही पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच मैदानी आणि लेखी परीक्षेच्या तयारीला लागावं, असं आवाहन केलं जात आहे.
जून 2027 पर्यंत रिक्त राहणाऱ्या अंदाजे 8,100 जागांवर ही नवी भरती होण्याची शक्यता आहे. याआधी भरती झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण जूनपासून सुरू झालं असून, उर्वरित उमेदवारांचं प्रशिक्षण फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारी 2027 पासूनच नवीन भरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात केली जाऊ शकते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
8,100 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत अर्ज सादर करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर 1 जानेवारी 2027 ते 31 मार्च 2027 या काळात भरती प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होईल. या दोन्ही टप्प्यांमधल्या कालावधीत उमेदवारांना आवश्यक ती कागदपत्रं आणि तयारी पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. हे वेळापत्रक लक्षात घेऊन तरुणांनी आतापासूनच कठोर सराव आणि नियोजन केलं, तर या संधीचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.