राज्यात पुन्हा पावसाचं आगमन, २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे राज्यभरात उकाडा चांगलाच वाढला होता. उन्हाच्या झळाही जाणवू लागल्या होत्या. पण मध्यरात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) सॅटेलाईट प्रणालीनुसार राज्यात पुढील ५ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळणार आहेत. येत्या ७२ तासांत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण भागात विजांच्या कडकडाटासह ताशी ३०-५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासाठी पुढील ३ दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर आज मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे.
आज, २१ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. २२ सप्टेंबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विदर्भासह मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांतही पावसाची शक्यता आहे.
२२ सप्टेंबरला येलो अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशीम आणि यवतमाळ यांचा समावेश आहे. याशिवाय नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर (घाट परिसर) या जिल्ह्यांतही येलो अलर्ट आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अगदी तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात.
२३ सप्टेंबरला राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. याआधीच्या अंदाजातही २२ सप्टेंबरला राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजानुसार आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.