राज्यात परतीच्या पावसाची हलकी हजेरी, कोकण आणि गडचिरोलीला यलो अलर्ट
मान्सूनने माघारीचा प्रवास सुरू केला असताना हवामान विभागाने मंगळवारी 6 ऑक्टोबरसाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. आता हवामानात बदलाचे संकेत मिळू लागले आहेत. यंदाच्या मान्सून हंगामात पावसाची मोठी तूट राहिली आणि आता मान्सूनने माघारीचा प्रवास सुरू केला आहे. पण बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. म्हणूनच सध्या राज्यात कुठे ऊन, कुठे ढगाळ हवा, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी असे मिश्र हवामान आहे.
हवामान विभागाने आज, मंगळवारी 6 ऑक्टोबर रोजी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी पुढे हवामान कसे राहील याकडे लक्ष ठेवून आहेत.
कोकणात पालघर, ठाणे आणि मुंबईत आज हवामान मुख्यतः कोरडे राहील, असा अंदाज आहे. पण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी झाला आहे. या भागांत विशेषतः संध्याकाळनंतर हलक्या सरी येऊ शकतात. कोकणात कमाल तापमान सुमारे 35 अंश, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे आणि हवामान मुख्यतः कोरडे राहील. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकते. उष्ण आणि दमट हवेमुळे लोकांना उकाड्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर आणि सोलापूरमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मात्र हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे. इथे तापमानाचा पारा वाढत आहे. कमाल तापमान 31 ते 33 अंश, तर किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस राहू शकते. बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवरही होण्याची शक्यता आहे.
विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांना आज कोणताही अलर्ट नाही. पण गडचिरोली जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी झाला आहे. काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीसाठी 7 ऑक्टोबर रोजीही यलो अलर्ट कायम राहण्याचा अंदाज आहे.
एकंदरीत, परतीच्या पावसासाठी राज्यातील वातावरण पूर्णपणे अनुकूल नसले, तरी काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता कायम आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. पुढच्या काळात ऑक्टोबर हीटचा प्रभाव किती वाढतो आणि पावसाची स्थिती कशी राहते, याकडे नागरिक आणि शेतकरी लक्ष लावून आहेत.