राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, विजांचाही धोका
हवामान खात्याने 21 ते 24 सप्टेंबर या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा सुधारित अंदाज दिला आहे.
राज्यात पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही. हवामान खात्याने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या चार दिवसांत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना तर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
21 सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्याचवेळी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, तिथे वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहू शकतो.
कोकणात 21 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, तर तुरळक भागांत जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीज कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
22 सप्टेंबरला कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह वीज कडाडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि तुरळक भागांत जोरदार पाऊस व मेघगर्जना अपेक्षित आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
23 सप्टेंबरला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. विदर्भात मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
24 सप्टेंबरला कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस व मेघगर्जनेसह वीज कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून, नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी आणि वादळी वाऱ्याच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.