मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:21 IST

विखे पाटील घराण्याची कन्या नीला स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या

अहिल्यानगरशी नाळ जोडलेल्या नीला विखे पाटील यांनी स्टॉकहोम मतदारसंघातून स्वीडनच्या रिक्सडॅगमध्ये प्रवेश केला असून त्यांचा राजकीय प्रवास घरातूनच सुरू झाला होता.

विखे पाटील घराण्याची कन्या नीला स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्रातील विखे पाटील घराण्याचं नाव आता स्वीडनच्या संसदेतही झळकणार आहे. अहिल्यानगर येथील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या 41 वर्षीय मुलगी नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून एन्ट्री केली आहे. 13 सप्टेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्या ग्रीन पार्टीच्या नेत्या असून या यशामुळे भारत आणि महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलं आहे.

नीला यांना राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार घरातूनच मिळाले. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणारे सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात, तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत. स्वीडनच्या 349 सदस्यांच्या रिक्सडॅग या संसदेत निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या मोजक्या नेत्यांमध्ये आता त्यांचा समावेश झाला आहे.

नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचं लहानपण आणि सुरुवातीचं शिक्षण अहिल्यानगरमध्ये (अहमदनगर) झालं. पुढे त्यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली, तसंच एमबीएही पूर्ण केलं. माद्रिदमधल्या युनिव्हर्सिटी डी कॉम्प्ल्युटेन्समधूनही त्यांनी एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. 2020 पासून त्या 'प्राइसवॉटरहाऊसकूपर्स' म्हणजेच PwC या जागतिक सल्लागार कंपनीत धोरण, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि जोखीम व्यवस्थापन या विभागांत काम करत आहेत.

गेली 25 वर्षं नीला स्वीडनमधल्या ग्रीन पार्टीत सक्रिय आणि प्रभावी नेत्या म्हणून काम करत आहेत. खासदार होण्याआधी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या काळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात विशेष राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं, ज्यात वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण यासारखे विषय त्यांनी हाताळले. याशिवाय त्या स्टॉकहोम महानगरपालिकेच्या नगर परिषदेवर नगरसेविका म्हणूनही होत्या. सध्या त्या स्टॉकहोम ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीच्या सदस्य आहेत.

निवड झाल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना नीला म्हणाल्या, "स्वीडनच्या 349 सदस्यांच्या संसदेत देशाचं आणि स्टॉकहोम शहराचं प्रतिनिधित्व करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्या आजोबांना (बाळासाहेब विखे पाटील) अभिमान वाटेल असंच काम मला करायचं आहे." त्या पुढे म्हणाल्या, "मी अवघ्या 15 वर्षांची असताना आजोबांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता, आणि तिथूनच माझ्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ते मला दर आठवड्याला फोन करायचे." विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष आणि नीला यांचे वडील अशोक विखे पाटील यांनी मुलीच्या या यशाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.

पुढच्या भूमिकेबद्दल बोलताना नीला म्हणाल्या, "मला अशा समाजासाठी काम करायचं आहे जिथे प्रत्येक मुलाला चांगल्या भविष्याची संधी मिळेल. जे लोक मतदान करू शकत नाहीत त्यांचा आवाज बनायला मला आवडेल. आपल्या सर्वांना स्वच्छ पाणी, समृद्ध निसर्ग आणि मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती कमी असलेला देश हवा आहे." भारताबद्दलच्या प्रेमाबद्दल त्या म्हणाल्या, "माझं भारतावर खूप प्रेम आहे आणि इथल्या लोकांशी मला खूप जवळीक वाटते. माझे अनेक जवळचे भारतीय मित्र आहेत."

13 सप्टेंबरच्या निवडणुकीत स्वीडनमधल्या डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांना निसटतं बहुमत मिळालं. स्वीडिश निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 349 जागांच्या रिक्सडॅग संसदेत विरोधी पक्षांच्या 4 गटांनी 176 जागा जिंकल्या, तर सत्ताधारी आणि पुराणमतवादी आघाडीला 173 जागांवर समाधान मानावं लागलं. विरोधात असलेल्या ग्रीन पार्टीचा मुख्य भर पर्यावरणवाद, अक्षय ऊर्जा आणि हरित राजकारणावर आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ