महाबळेश्वरमध्ये विजयादशमीनिमित्त संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन, शहरवासीयांकडून फुलांची उधळण
पेटीट ग्रंथालय मैदानातून निघालेल्या संचलनात पाच वर्षांच्या स्वयंसेवकापासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ स्वयंसेवकापर्यंत सगळे पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाबळेश्वर शहरात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन काढण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे पथसंचलन आयोजित केले जात आहे. यंदाही संघाच्या संचलनासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील स्वयंसेवक पेटीट ग्रंथालय मैदानात एकत्र जमले होते. स्वयंसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती आणि संचलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात 'संपत', 'स्वागत प्रणाम' आणि 'ध्वजारोहण' यांनी झाली. त्यानंतर पेटीट ग्रंथालय मैदानावरून पथसंचलनाला सुरुवात झाली. या वेळी सहघोष संचलनाने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संचलन नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, महावितरण कार्यालय आणि रामगड परिसर यांतून कोळी आळी व मरीपेठ मार्गे स्कूल मोहल्ल्यापर्यंत गेले. तिथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य बाजारपेठेमार्गे हॉली क्रॉस चर्चपर्यंत आले आणि पुन्हा पेटीट ग्रंथालयात पोहोचले. वाटेत ठिकठिकाणी शहरवासीयांनी स्वतःहून भगव्या ध्वजावर आणि स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली. हे दृश्य अतिशय नयनमनोहर होते.
शहरातील हे ऐतिहासिक संचलन डॉ. श्री अभय श्रीहरी देशपांडे आणि स्वयंसेवकांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तीत पार पडले. पाच वर्षांच्या स्वयंसेवकापासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ स्वयंसेवकापर्यंत सगळे पथसंचलनात पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. कार्यक्रमात सांघिक पद, सुभाषित आणि अमृतवचन सादर करण्यात आले.
त्यानंतर संजय संकपाळ गुरुजी यांनी प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांची उपस्थितांना ओळख करून दिली. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक संदेश उर्फ नंदूशेठ रानडे उपस्थित होते. त्यांनी संघाची सेवाभावी वृत्ती आणि शिस्त यांचे मनापासून कौतुक केले.
सोहळ्याचे प्रमुख वक्ते स्वयंसेवक अविनाश सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना अपेक्षित असलेले कार्य प्रत्येकाने करावे, असे आवाहन केले. संघाच्या स्थापनेचा उद्देश, इतिहास आणि आतापर्यंतची वाटचाल याबद्दलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.