लीलावती हॉस्पिटलमध्ये श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी नवे एव्हीटी क्लिनिक सुरू
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ऐकण्याची क्षमता कमी असलेल्या मुलांसाठी ऑडिटरी व्हर्बल थेरपी (एव्हीटी) क्लिनिक सुरू केले आहे.
ऐकण्याची क्षमता कमी असलेल्या मुलांच्या पुनर्वसनाची गरज लक्षात घेऊन लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने स्वतंत्र ऑडिटरी व्हर्बल थेरपी (एव्हीटी) क्लिनिक सुरू केले आहे. हे क्लिनिक खास अशा मुलांसाठी आहे.
या क्लिनिकमध्ये श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांना विशेष थेरपी दिली जाणार आहे. ज्या मुलांची कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांच्यावर विशेष लक्ष असेल. थेरपीबरोबरच कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून मदतही दिली जाईल. कॉक्लियर इम्प्लांट हे एक इलेक्ट्रॉनिक श्रवण उपकरण आहे आणि त्यामुळे श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांना आवाज ऐकता येतो.
मुलांनी ऐकावे, बोलावे, इतरांशी बोलून संवाद साधावा आणि रोजच्या जीवनात तसेच शिक्षणात सहभागी व्हावे, यासाठी त्यांना मदत करणे हा या क्लिनिकचा उद्देश आहे.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, दर १००० नवजात बालकांपैकी सुमारे ५ ते ६ मुलांमध्ये श्रवणशक्ती कमी असते. अशा मुलांमधील हा दोष बहुतेक वेळा विकासाचे महत्त्वाचे टप्पे उलटून गेल्यानंतरच लक्षात येतो. त्यामुळे लवकर निदान आणि वेळेवर योग्य उपचार गरजेचे आहेत, असे यातून दिसते. अशा मुलांमध्ये भाषा आणि बोलण्याची क्षमता चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी पुनर्वसन अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही यात म्हटले आहे.
कॉक्लियर इम्प्लांटमुळे मुलांना आवाज ऐकू येतो, पण फक्त एवढ्याने प्रभावी संवाद साधता येत नाही. एव्हीटी मुलांना ऐकलेल्या आवाजांचा वापर करून भाषण आणि भाषेची कौशल्ये विकसित करण्यास मदत करते. त्यामुळे मुलांना बोलणे, शिकणे आणि इतरांशी सहज संवाद साधणे सोपे होते. नियमित थेरपी सत्रांमधून मुले रोजच्या बोलण्यात आणि शिक्षणाशी संबंधित उपक्रमांत सहभागी होऊ शकतात.
या क्लिनिकच्या सुरुवातीबद्दल बोलताना लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे पर्मनंट ट्रस्टी फॉर लाइफ श्री. राजीव के. मेहता म्हणाले, "कॉक्लियर इम्प्लांटेशन हे मुलाच्या श्रवण प्रवासातील पहिले पाऊल आहे. आमच्या एव्हीटी क्लिनिकद्वारे आम्ही सुनिश्चित करू इच्छितो की, मुलांना केवळ आवाज ऐकण्याची क्षमता मिळणार नाही, तर शाळा आणि दैनंदिन जीवनात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक बोलण्याची कौशल्ये आणि आत्मविश्वास देखील विकसित होईल. या उपक्रमामधून गरजू तसेच वंचित घटकांतील मुलांसह सर्व बालकांसाठी दर्जेदार श्रवण पुनर्वसन सहज उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते."
सुरू करण्यात आलेल्या या एव्हीटी क्लिनिकमुळे हॉस्पिटलची समाजसेवेप्रती असलेली कटिबद्धता अधिक दृढ होते आणि मुलांना स्वतंत्र व सुकर जीवन जगण्यासाठी मदत मिळते, असे सांगण्यात आले आहे.