शिवा शर्मा मृत्यू: फरार श्रद्धा दुबेच्या फ्लॅटमध्ये औषधांचा साठा सापडला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
लखनऊमधील रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असलेली मॉडेल श्रद्धा दुबे हिच्याबद्दल पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी कळल्या आहेत. हजरतगंज पोलिसांनी तिच्या फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा तिथे शक्तिवर्धक औषधांचा साठा सापडला.
पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी श्रद्धा आणि तिची बहीण रश्मी या दोघीही त्या फ्लॅटमध्ये होत्या, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
आता या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहू. ९ ऑक्टोबरच्या रात्री २७ वर्षांचे रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा यांचा लखनऊच्या हजरतगंज परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यांची आई रंजना शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शिवा गेले काही महिने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
श्रद्धा शिवाला ब्लॅकमेल करत होती, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती आणि आपल्यासोबत राहण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. शिवाला आधी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले, असाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शिवाच्या शरीरावर गंभीर जखमा, जबडा तुटल्याच्या खुणा आणि सिगारेटने भाजल्याच्या खुणा असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर श्रद्धा दुबे फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर श्रद्धा लखनऊमधून अयोध्येच्या दिशेने निघून गेली असावी, असा संशय आहे. त्यामुळे हजरतगंज पोलीस टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. श्रद्धाचा शोध घेण्यासाठी दिल्लीपासून नेपाळपर्यंत विशेष पथके कामाला लावण्यात आली आहेत. सध्या पाच संशयितांची चौकशी सुरू आहे.
तपासात श्रद्धाचे यापूर्वी लग्न झाले असल्याचेही समोर आले आहे. ती रायबरेली येथे पती प्रिंस दुबे याच्यासोबत राहत होती आणि सुमारे दहा वर्षांपूर्वी पतीला सोडून लखनऊला आली, असे सांगण्यात येते. त्यानंतर भरपूर पैसे कमावण्याच्या महत्त्वाकांक्षेतून तिने मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांमध्ये ओळखी वाढवल्या, असेही सांगितले जात आहे.
पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासला, तेव्हा त्यात काही मोठे बिल्डर, राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींचे नंबर आढळल्याचे सांगण्यात येत आहे. श्रद्धा काही लोकांशी जवळीक वाढवून त्यांच्याकडून पैसे उकळत होती का, तसेच खासगी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करत होती का, याची पडताळणी पोलीस करत आहेत. मात्र हे सर्व आरोप अद्याप तपासाच्या टप्प्यात असून त्यांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.