कुलाबा गणेश मंडळाला धमकावल्याचा आरोप, संजय राऊत यांचे आयुक्तांना पत्र
कुलाबा येथील बाल गोपाल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना ट्राफीक पोलिस अधिकाऱ्याने शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
राज्यभर गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून पोलिस आणि मंडळाचे कार्यकर्ते उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कुलाबा येथील बाल गोपाल मित्र मंडळाला भेट दिली. या भेटीत मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राऊत यांच्याकडे एक गंभीर तक्रार मांडली.
मंडळाकडे गणेश उत्सवाचा वैध परवाना असतानाही साउथ झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत हे जागेवर जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर तेथे उपस्थित असलेल्या महिलांशी असभ्य वर्तन करण्यात आले आणि महिलांच्या हातातील मोबाईल फोन खेचण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात आले. या घटनेनंतर संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात राऊत यांनी या घटनेमागे राजकीय पाठबळ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, हेमराज राजपूत यांच्या मार्फत या घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न पांडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. राऊत यांनी पत्रात नमूद केले की, पालिका निवडणुकीत या मंडळाने मकरंद नार्वेकर यांना समर्थन न दिल्यामुळे झोनचे ट्राफीक पोलिस अधिकारी हेमराज राजपूत यांनी हे घृणास्पद आणि बेकायदेशीर वर्तन केले.
कुलाबा विभागात इतरही अनेक गणेश मंडळे आहेत, मात्र कुलाबा पास्ता लेन येथील बाल गोपाल मित्र मंडळच का लक्ष्य ठरले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करत संजय राऊत यांनी पत्रात या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या विभागातील कोणत्याही अन्य गणेश उत्सवाबाबत तक्रार नसताना केवळ याच मंडळाला लक्ष्य केले गेल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी तक्रार देत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या दहशतीखाली असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही राऊत यांनी नमूद केले आहे. गणेश उत्सवाला कोठेही गालबोट लागू नये, अशी चिंता मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.
राऊत यांनी सोशल मीडियावरही पोलिस आयुक्त देवेन भारती यांना उद्देशून पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. आयुक्तांकडून या तक्रारीवर पुढे काय कारवाई होते, याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.