ध्वनिप्रदूषण मर्यादा मोडणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पुणे पोलिस आयुक्तांकडे निसर्ग सेवक संस्थेची मागणी; पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच ९१ मंडळांवर गुन्हे
गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी आणि वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादा मोडणाऱ्या गणेश मंडळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निसर्ग सेवक संस्था आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. वेलणकर यांनी आरोप केला की, यापूर्वी गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे ते मागे घेतले जात असल्याचा अनुभव आहे, आणि त्यामुळेच मंडळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचे धाडस करतात.
पत्रात वेलणकर यांनी नमूद केले की, विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत शहरातून पोलिसांकडे अनेक तक्रारी आलेल्या असतील. पोलिस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनीही या उल्लंघनांच्या नोंदी घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. याच नोंदींच्या आधारावर संबंधित मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत महिनाभरात न्यायालयात खटले दाखल करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी जागेवर कारवाई टाळली असेल, हे समजण्यासारखे आहे, असे वेलणकर म्हणाले. मात्र आता तातडीने कायदेशीर कारवाई केली नाही, तर दरवर्षी ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच जातील, असा इशारा देत त्यांनी पोलिस आयुक्तांना तातडीने कारवाईचे आवाहन केले.
विसर्जन मिरवणुकीत यंदाही प्रचंड दणदणाट झाला आणि त्यामुळे लोक हैराण झाले होते. ध्वनी प्रदूषणात कोणतीही घट जाणवली नाही; मध्यवर्ती नारायण पेठेत ध्वनी प्रदूषण कळसाला पोहोचले होते. ध्वनी प्रदूषणाविरोधात लढणारे विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्या आंदोलनाला यश आले नाही, कारण काही मंडळांनी त्यांचे आर्टिफिशल इंटेलिजन्स व्हिडिओ बनवून, ते बोलत असल्याचे दाखवत नाचवले. ३६५ दिवस शांतता हवी असून त्यासाठी आपले काम सुरूच राहणार असल्याचेही बापट म्हणाले. पोलिसांनी ऑन द स्पॉट कारवाई करायला हवी होती, आणि डेसीबलविरुद्ध कारवाईची इच्छा होती तर ती त्याचवेळी का केली नाही, असा सवाल करत ती आता तरी पुढील काही दिवसांत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा आधीच उगारला आहे. १४ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरात ध्वनिप्रदूषणासंदर्भात एकूण ९१ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, परिमंडळ १ मध्ये २९, परिमंडळ २ मध्ये ४४, परिमंडळ ३ मध्ये ८ आणि परिमंडळ ४ मध्ये १० गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, संत तुकारामनगर, दापोडी, बावधन, काळेवाडी, हिंजवडी, वाकड, भोसरी, चाकण दक्षिण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी आणि शिरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे.