मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:27 IST

कोरपनातील यशोधन विहार सदनिकांना खरेदीनंतर लगेच तडे, म्हाडाकडे चौकशीची मागणी

यशोधन विहार (म्हाडा) प्रकल्पातील सदनिका खरेदी केल्यानंतर काही महिन्यांतच भिंतींना तडे गेल्याची तक्रार एका सदनिकाधारकाने म्हाडाच्या नागपूर विभागाकडे केली आहे.

कोरपनातील यशोधन विहार सदनिकांना खरेदीनंतर लगेच तडे, म्हाडाकडे चौकशीची मागणी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

कोरपना येथील यशोधन विहार या म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकल्पातील सदनिका खरेदी केल्यानंतर थोड्याच काळात भिंतींना तडे गेल्याची तक्रार सदनिकाधारक ज्ञानेश्वर गोखरे यांनी म्हाडाच्या नागपूर विभागाकडे नोंदवली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करावी आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी गोखरे यांनी केली आहे.

गोखरे यांनी यशोधन विहार प्रकल्पातील सदनिका क्रमांक 39/08 ही 28 जुलै 2025 रोजी 10 लाख 26 हजार 790 रुपयांना खरेदी केली होती. मात्र सदनिका ताब्यात घेतल्यानंतर अल्पावधीतच बांधकामात तडे किंवा क्रॅक्स दिसू लागल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रकल्पातील इतरही काही सदनिकांमध्ये असेच तडे गेल्याचे इतर रहिवाशांकडून समजल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. हे तडे केवळ प्लास्टरपुरते मर्यादित आहेत की बांधकामाच्या संरचनात्मक गुणवत्तेशी संबंधित आहेत, हे तांत्रिक तपासणीतूनच स्पष्ट व्हायला हवे, असे गोखरे यांचे म्हणणे आहे.

तक्रारीत प्रकल्पातील आर.सी.सी. कामाची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांधकामादरम्यान काँक्रीटचे क्यूब सॅम्पल घेण्यात आले होते का, त्यांची ओळख, दिनांक व ठिकाण याच्या नोंदी ठेवण्यात आल्या होत्या का, तसेच गुणवत्ता नियंत्रणाशी संबंधित इतर नोंदी उपलब्ध आहेत का, याची पडताळणी करावी अशी मागणी आहे. त्यासोबतच क्यूब टेस्ट अहवाल, काँक्रीट मिक्स डिझाइन, स्लंप टेस्ट अहवाल, मटेरियल टेस्ट अहवाल, स्ट्रक्चरल ड्रॉइंग आणि म्हाडाच्या संबंधित अभियंत्यांनी वेळोवेळी केलेल्या पाहणीचे अहवाल तपासावेत, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

सदनिकांना नेमक्या कोणत्या कारणामुळे तडे गेले, याचा शोध घेण्यासाठी पात्र स्ट्रक्चरल इंजिनिअरमार्फत स्वतंत्र तपासणी व्हावी, अशी मागणीही तक्रारीत आहे. केवळ वरवरची डागडुजी करून प्रश्न न मिटवता तड्यांचे मूळ कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय करावा, असे गोखरे यांनी नमूद केले आहे. यापूर्वी काही दुरुस्ती झाली असल्यास त्याची नोंद, सदनिकाधारकांच्या इतर तक्रारी आणि प्रकल्पधारकाने त्यावर काय कार्यवाही केली, याचीही चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या स्वतंत्र पथकाने प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करावी, ही तक्रारीतील प्रमुख मागणी आहे. तडे गेलेल्या सदनिकांचा तांत्रिक पंचनामा किंवा निरीक्षण अहवाल तयार करावा आणि गरज भासल्यास अधिकृत प्रयोगशाळेमार्फत काँक्रीट व इतर बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बांधकामात नियमभंग झाल्याचे किंवा निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे आढळल्यास संबंधित प्रकल्पधारक, कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच बांधकाम धोकादायक स्थितीत आढळल्यास सदनिकाधारकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोखरे यांनी केली आहे.

"मोठ्या कष्टाने पाई पाई जमा करून खरेदी केलेल्या घराला अल्पावधीतच तडे जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे केवळ किरकोळ डागडुजी न करता बांधकामाची गुणवत्ता आणि सदनिकाधारकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा विचार करून सखोल तांत्रिक चौकशी करावी," अशी मागणी सदनिकाधारक ज्ञानेश्वर गोखरे यांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ