सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:54 IST

समृद्धी महामार्गावर भोजडे शिवारात 69 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पकडला

कोपरगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित सुगंधित गुटख्याचा आयशर टेम्पो पकडला; चालक ताब्यात, सात आरोपी फरार.

समृद्धी महामार्गावर भोजडे शिवारात 69 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पकडला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारात समृद्धी महामार्गावर शनिवारी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. प्रतिबंधित सुगंधित गुटखा घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक डी डी 01 ए ए 9545) पोलिसांनी पकडला.

या कारवाईत 44 लाख 28 हजार रुपये किमतीचा गुटखा आणि 25 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण अंदाजे 69 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इंदूरहून दुसऱ्या ठिकाणी सुगंधित गुटख्याचा पुरवठा करण्यासाठी हा माल नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून समृद्धी महामार्गावर 509 क्रमांकाच्या ठिकाणी पोलिसांनी टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने गाडी पळवली. तो साधारण 12 किलोमीटर पुढे जाऊन महामार्गावरून खाली उतरला. पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

अटक केलेल्या चालकाचे नाव दिनेश रामचंद्र शर्मा असून तो मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. या प्रकरणातील आणखी सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे. त्यांत रवींद्र कुमार उर्फ जालीम सिंग (रा. इंदूर), दिलीप बदलानी (रा. जळगाव), सतीश जयस्वाल उर्फ लाला आणि सोहेल उर्फ नदीम (दोघे रा. संभाजीनगर), अक्षय भंडारी आणि धर्म सुपेकर (दोघे रा. जालना) तसेच लाला जयस्वाल (रा. संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुटख्याचा पुरवठा करणारी साखळी उघड करण्यासाठी आणि फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकात पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण गांगुर्डे, विजय पवार, अभिजित अरकल तसेच पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे, दीपक जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि विशाल तनपुरे यांचा समावेश होता.

दरम्यान, कोपरगाव शहरातही प्रतिबंधित गुटखा सहज मिळतो, अशा तक्रारी आहेत. एवढी मोठी कारवाई झाल्यावर शहरातील गुटखा विक्रेते आणि साठेबाज यांच्यावरही कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक, साठवणूक आणि विक्री थांबवण्यासाठी प्रशासन आणखी कठोर पावले उचलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ