मंदार जाधव यांनी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरू केलं 'धाकट्या सुनबाई'चं शूटिंग
झी मराठीच्या 'धाकट्या सुनबाई' मालिकेत वेदांत पटवर्धन साकारणारे मंदार जाधव यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं.
अभिनेते मंदार जाधव झी मराठीच्या 'धाकट्या सुनबाई' या मालिकेत वेदांत पटवर्धन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहेत. झी मराठीसोबत ते पहिल्यांदाच काम करत आहेत. मालिकेच्या शूटिंगची सुरुवात कोल्हापुरात झाली, आणि त्याबद्दल त्यांनी स्वतः सांगितलं.
मंदार यांच्या म्हणण्यानुसार, शूटिंगच्या निमित्ताने त्यांचं खूप फिरणं होतं. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचं शूटिंग कोल्हापुरातच झालं आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं, तिचे आशीर्वाद घेतले आणि मगच कामाला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग झालं.
पंचगंगा नदीच्या गंगा घाटावरही बरेच सीन शूट झाले आहेत. ते मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांत दिसतील. वेदांत आणि राधिका यांची पहिली भेटही याच नदीकाठी होते. शूटिंग सुरू असल्याचं स्थानिक लोकांना कळलं आणि कलाकारांना भेटायला तिथे प्रचंड गर्दी जमली. मंदार म्हणतात की, प्रेक्षक रोज टीव्हीवर दिसतात, पण अशा वेळी त्यांना प्रत्यक्ष भेटता येतं, त्यांच्याशी बोलता येतं. हे खूप खास असतं आणि तो एक कमाल अनुभव होता.
वेदांत हा आजच्या पिढीचा, सुशिक्षित आणि सुसंस्कृत तरुण आहे, असं मंदार सांगतात. तो कुटुंबावर मनापासून प्रेम करतो, सगळ्यांना सांभाळून घेतो आणि सर्वांचा आदर करतो. अन्याय किंवा अत्याचार तो कधीच सहन करत नाही. कुटुंबाच्या विरोधात जावं लागलं तरी योग्य गोष्टीसाठी तो मागे हटत नाही.
झी मराठीसोबत काम करण्याची मंदार यांना खूप दिवसांपासून इच्छा होती, पण काही कारणांमुळे ते जुळून येत नव्हतं. ही मालिका कोठारे व्हिजनची निर्मिती आहे आणि याआधीही त्यांनी कोठारे व्हिजनसोबत काम केलं आहे. म्हणूनच मालिकेसाठी कॉल आला, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. झी मराठीवर काम करण्याची संधी आणि पुन्हा एकदा महेश कोठारे यांच्यासोबत काम करण्याची संधी, असा दुहेरी आनंद त्यांना झाला.
वेदांतच्या भूमिकेसाठी मंदार यांनी स्वतःला फिजिकली ट्रान्सफॉर्म केलं आहे. रोज जिमला जाणं, खाण्यापिण्याचं पथ्य पाळणं आणि फिटनेसकडे लक्ष देणं, हे सगळं ते करत आहेत. प्रोमोमध्ये त्याचा परिणाम दिसला असेल, असं ते म्हणतात. या लूकला आणि प्रोमोला प्रेक्षकांकडून छान प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकलाकारांबद्दल बोलताना मंदार म्हणाले की, सगळेच कलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत आणि सुरुवातीपासूनच त्यांच्यात छान केमिस्ट्री जुळली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे अतिशय छान पद्धतीने काम करून घेत आहेत. राधिका आणि वेदांत यांची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे.
मंदार यांच्या आयुष्यातील पहिली मालिका झी टीव्हीवरची 'अल्लादिन' होती, ज्यात त्यांनी अल्लादिनची भूमिका केली होती. आता पुन्हा झी कुटुंबाशी जोडले गेल्याचं ते सांगतात. प्रेक्षकांचे त्यांनी मनापासून आभार मानले. 'धाकट्या सुनबाई' ही मालिका संध्याकाळी ६:३० वाजता झी मराठीवर दिसते.