कोपर आणि गुडघे काळवंडलेत? किचनमधल्या 'या' पदार्थांपासून बनवा घरगुती स्क्रब
चेहऱ्याची काळजी घेताना कोपर आणि गुडघ्यांकडे दुर्लक्ष होतं. महागड्या केमिकलयुक्त क्रीमऐवजी किचनमधल्या पदार्थांपासून बनवलेला स्क्रब वापरून हा काळेपणा कमी करता येऊ शकतो.
चेहऱ्याच्या त्वचेची निगा राखण्यासाठी बायका आणि पुरुष दोघेही खूप मेहनत घेतात. दिवसातून दोनदा चेहरा धुणे, सीरम लावणे, फेसमास्क लावणे असं वेगवेगळं स्किन केअर रुटीन पाळलं जातं. पण याच दरम्यान कोपर आणि गुडघ्यांची काळजी घ्यायची मात्र हमखास राहून जाते. त्यामुळे चेहरा उजळ आणि चमकदार दिसत असला तरी हाताचे कोपर आणि गुडघे मात्र कायम काळवंडलेले दिसतात.
हे काळेपण घालवण्यासाठी अनेकजण बाजारात मिळणाऱ्या निरनिराळ्या क्रीमचा आधार घेतात. पण या क्रीममध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी उलट वाढू शकतात. त्यामुळे महागड्या क्रीमवर पैसे खर्च करण्यापेक्षा घरातल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून नॅचरल स्क्रब बनवला, तर त्वचेवरची डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.
यातला पहिला उपाय म्हणजे कॉफी स्क्रब. यासाठी एका वाटीत कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करायचं. हे मिश्रण कोपर आणि गुडघ्यांवर लावून काही वेळ तसंच ठेवायचं, त्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचा. या मसाजमुळे साचलेली डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. मसाज झाल्यावर हा स्क्रब सुमारे १० मिनिटं त्वचेवर तसाच राहू द्यायचा आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकायचा. कॉफी स्क्रबमुळे त्वचेवर साचलेल्या पेशी निघून जातात आणि त्वचा आतून चमकदार दिसू लागते.
दुसरा उपाय म्हणजे साखरेचा स्क्रब. काळवंडलेले गुडघे आणि कोपर स्वच्छ करण्यासाठी साखर उपयुक्त ठरते. यासाठी वाटीत साखर, लिंबाचा रस आणि मध एकत्र करून नीट मिक्स करायचं. हे मिश्रण तयार झाल्यावर हलक्या हाताने मसाज करायचा आणि काही वेळ तसंच राहू द्यायचं. साखर आणि लिंबातल्या नैसर्गिक गुणांमुळे काळवंडलेली त्वचा आतून स्वच्छ आणि उजळ होण्यास मदत मिळते.
तिसरा पर्याय आहे ओटमील स्क्रबचा. त्वचेवर साचलेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रब करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. यासाठी वाटीत ओटमील आणि दही एकत्र मिक्स करून हे मिश्रण संपूर्ण गुडघे आणि कोपऱ्यांवर लावायचं आणि हलक्या हाताने मसाज करायचा. या मसाजमुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि शरीरावरचा वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते. मात्र स्क्रब केल्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे स्क्रबनंतर मॉईश्चरायझर लावणं गरजेचं आहे.
हा लेख केवळ सर्वसाधारण माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.