गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
09:51 IST

नादुरुस्त रोहित्राची तक्रार आता महावितरणच्या मोबाईल अॅपवर, एका क्लिकमध्ये नोंद

बंद किंवा नादुरुस्त रोहित्राची माहिती कोणालाही अॅपवरून देता येणार, महावितरणची नवी सुविधा सुरू.

नादुरुस्त रोहित्राची तक्रार आता महावितरणच्या मोबाईल अॅपवर, एका क्लिकमध्ये नोंद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर : बंद पडलेल्या किंवा नादुरुस्त रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) तक्रार आता महावितरणच्या मोबाईल अॅपवर एका क्लिकमध्ये नोंदवता येणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने ही सुविधा सुरू केली आहे. कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्राची माहिती कोणालाही अॅपवरून देता येईल, त्यामुळे रोहित्र बदलणे किंवा दुरुस्त करणे लवकर शक्य होईल.

नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी महावितरणने राज्यभरात यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पण नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती मिळण्यास उशीर होत असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नागरिकांना 'महावितरण मोबाईल अॅप'मधून नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळवण्याची खास सोय देण्याची सूचना केली. त्यानुसार ही सुविधा अॅपवर सुरू झाली आहे.

राज्यभरातील ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे (डीटीसी) जिओ लोकेशनसह मॅपिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे फक्त लोकेशनच्या आधारे नादुरुस्त रोहित्राची माहिती देणे कोणालाही शक्य झाले आहे. हे अॅप डाऊनलोड केलेल्या प्रत्येक मोबाईलधारकाला मराठी आणि इंग्रजी भाषेत ही माहिती कळवता येईल. अॅप 'प्ले स्टोअर' किंवा 'एप्पल स्टोअर'वर उपलब्ध आहे.

अॅपमध्ये ग्राहक क्रमांकाने लॉगिन करूनही तक्रार नोंदवता येईल, किंवा लॉगिन न करता गेस्ट म्हणूनही. मात्र माहिती कळवताना संबंधित नादुरुस्त रोहित्राच्या जवळ असणे आवश्यक आहे. मुख्य पानावरील 'नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा' या रकान्यावर क्लिक केल्यावर पुढच्या पानावर नाव आणि व्हॉटस् अॅपचा मोबाईल क्रमांक (लॉगिन नसल्यास) विचारला जाईल. त्याआधी अॅपमधील लोकेशन परमिशन 'ऑन' असणे आणि मोबाईलचे लोकेशन सुरू करणे गरजेचे आहे. मोबाईल क्रमांक दिल्यावर ओटीपी तयार करायला सांगितले जाईल आणि तो ओटीपी व्हॉटस् अॅपवर मिळेल.

ओटीपी व्हेरीफाय झाल्यावर एका चौकटीत नादुरुस्त किंवा बंद रोहित्राचा 'फोटो काढा' हा पर्याय येईल. त्या रोहित्राचा फक्त फोटो काढायचा आहे. चौकटीखालील नकाशात अक्षांश-रेखांशासह रोहित्राचे रेखाचित्र, नाव आणि क्रमांक (डीटीसी नंबर) दिसेल. एकापेक्षा जास्त रोहित्र असतील तर जे नादुरुस्त आहे त्यावर क्लिक करायचे. नंतर 'नोंद करा' (सबमीट) पर्यायावर क्लिक केले की ही माहिती संबंधित कार्यालयातील अभियंता आणि जनमित्रांना मोबाईल संदेशाद्वारे लगेच मिळेल आणि रोहित्राची तपासणी होईल. दोष लहान असेल तर रोहित्राची तात्काळ दुरुस्ती केली जाईल, आणि रोहित्र नादुरुस्त असेल तर ते ताबडतोब बदलले जाईल.

रोहित्र दुरुस्त झाले किंवा बदलले, याची माहिती तक्रार करणाऱ्यालाही व्हॉटस् अॅपवर कळवली जाईल.

अॅपशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर, संबंधित कार्यालयात किंवा ग्राहक सुविधा केंद्रात तक्रार देता येईल. २४ तास सुरू असलेल्या १८००२१२३४३५, १८००२३३३४३५, १९१२ किंवा १९१२० या टोल फ्री क्रमांकांवरही ही सोय उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्राहक रकान्यात जाऊन 'ऑनलाइन तक्रार नोंदवा'मध्ये ग्राहक क्रमांकाशी संबंधित रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदवता येईल. तसेच वेबसाईट किंवा अॅपवरील 'ऊर्जा चॅट बॉट'द्वारे मराठी आणि इंग्रजीत संवाद साधून इतर तक्रारींसोबत ही तक्रारही दाखल करता येईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ