मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:33 IST

कारवातील ग्रामस्थांचा रास्ता रोको; ताडोबातील बंद केलेला पारंपरिक रस्ता सुरू करण्याची मागणी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील कारवा (ता. सिंदेवाही) येथील सुमारे ३०० महिला-पुरुषांनी शनिवारी कारवा-शिवणी मार्गावर रास्ता रोको केला.

कारवातील ग्रामस्थांचा रास्ता रोको; ताडोबातील बंद केलेला पारंपरिक रस्ता सुरू करण्याची मागणी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्राच्या सीमेवर असलेल्या कारवा (ता. सिंदेवाही) येथील ग्रामस्थांनी शनिवारी दुपारी कारवा-शिवणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. वर्षानुवर्षे वापरात असलेला पारंपरिक रस्ता बंद करण्यात आल्याने त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन झाले. मोहुर्ली गेटमार्गे चंद्रपूरला जाणारा हा मार्ग पुन्हा सुरू करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

आंदोलनात सुमारे ३०० महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर वन अधिकाऱ्यांना 'गावबंदी' करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

कारवातील ग्रामस्थ मोहलीमार्गे चंद्रपूरकडे जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा नेहमी वापर करतात. वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता हा रस्ता बंद केला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शिवणीमार्गे सुमारे १३ किलोमीटरचा जादा फेरा मारावा लागतो. यात वेळ, इंधन आणि पैसा जास्त खर्च होतो. विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे.

या प्रश्नाकडे वन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी १४ जुलै रोजी ताडोबाच्या उपसंचालकांना लेखी निवेदन दिले होते. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री गावाची बैठक घेतली आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

कारवा-मोहली-खुटवंडा-झरी-पेठ तसेच मोहली गेटमार्गे चंद्रपूरकडे जाणारा पारंपरिक मार्ग तातडीने पुन्हा सुरू करावा, ही ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे. याशिवाय वन विभागाच्या विकास आणि संवर्धनाच्या कामांत स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य देऊन रोटेशन पद्धतीने रोजगार द्यावा, अशीही मागणी आहे. कोअर क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाले, तर टाळाटाळ न करता नुकसानग्रस्तांना तत्काळ आणि योग्य भरपाई द्यावी, असेही आंदोलकांनी म्हटले आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनातून शासनाला मोठा महसूल मिळतो. असे असताना जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या स्थानिकांनाच ये-जा करण्यासाठी १३ किलोमीटरचा जादा फेरा मारावा लागतो, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आंदोलनाचे नेतृत्व लवकुश पुसाम, विनोद मडावी, किष्णा लेनगुरे, चरनदास मानकर आणि सुरेश आदे यांनी केले. कारवा परिसरातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कारवा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद जांभुळे म्हणाले, 'ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवण्यात आली आहे. यावर लवकरच वरिष्ठ स्तरावरून नियमांतर्गत तोडगा काढला जाईल.'

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ