बार्डी गावात पाणीटंचाई, महिलांचा कर्जत पंचायत समितीवर मोर्चा; ग्रामस्थांचा संताप
कर्जत तालुक्यातील बार्डी गावात वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न कायम आहे. निवेदने देऊनही तोडगा न निघाल्याने महिलांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला.
कर्जत तालुक्यातील बार्डी गावात पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. वारंवार निवेदने देऊनही कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेर बार्डी गावातील महिला आणि ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि आक्रमक भूमिका घेतली.
ग्रामस्थांनी अशी तक्रार केली आहे की, नळपाणी योजनेचे पाणी गावात तीन-चार दिवसांतून एकदा येत आहे. त्यातही येणारे पाणी अत्यंत कमी दाबाने येत असल्यामुळे अनेक घरांना पाणी मिळत नाही. कित्येक घरांमध्ये तर पाणी देखील पोहोचत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीमार्फत होणारा पाणीपुरवठा अतिशय अनियमित असून तीन ते चार दिवसांतून फक्त एकदाच पाणी येते, असेही ग्रामस्थ सांगतात.
बार्डी गावातील नळपाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. गावातील ग्रामस्थांना पाण्याची अडचण होत असल्याबद्दल त्यांनी २६ डिसेंबर २०२५ आणि १८ मार्च २०२६ रोजी कर्जत पंचायत समितीकडे लेखी निवेदन दिले होते. एवढे करूनही नळपाणी योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत. हे काम व्हावे म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी पत्र दिले होते. मात्र ग्रामपंचायतीने तात्पुरते आश्वासन देऊन वेळ ढकलला. कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत आणि पंचायत समितीत जाऊन भेट दिली आणि लेखी निवेदनेही दिली, तरीही बार्डी गावातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी शासनाकडून आणि जिल्हा परिषदेकडून पाणीपुरवठा विभागाने कोणतेही सहकार्य केलेले नाही, अशी ग्रामस्थांची भावना आहे. मोर्चादरम्यान कर्जत पंचायत समितीमध्ये संबंधित अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी तब्बल अडीच तास ठिय्या मांडून संताप व्यक्त केला.
अखेर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्या मध्यस्थीने पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्जत पंचायत समितीकडून कार्यवाही झाली नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा महिलांनी दिला आहे. या मोर्चात गावातील महिला, माजी सदस्य तसेच माजी उपसरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.