मुंबईत तब्बल 712 कोटींची डील, फ्लॅट नव्हे तर अख्खा टॉवरच खरेदी
जुहू तारा रोडवरील एम्बेसी टेराझा या अलिशान टॉवरमध्ये एंजेल वनचे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी तळमजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत संपूर्ण इमारत खरेदी केली आहे.
मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक वेगळाच विक्रम नोंदवला गेला आहे. इथे एखादा फ्लॅट नाही तर एक संपूर्ण टॉवरच खरेदी करण्यात आला आहे, आणि तोही तब्बल 712 कोटी रुपयांना. ही खरेदी केली आहे शेअर मार्केट आणि ब्रोकिंग कंपनी असलेल्या एंजेल वनचे संस्थापक दिनेश ठक्कर यांनी. मुंबई रिअल इस्टेट मार्केटने यामुळे एक वेगळा टप्पा गाठला आहे असे म्हटले जात आहे.
जुहू तारा रोड हा भाग मुंबईतला असा परिसर आहे जिथे मोठमोठे बॉलीवूड सेलिब्रिटी आणि नामांकित उद्योगपती राहतात. याच भागातल्या एम्बेसी टेराझा या अलिशान टॉवरमध्ये दिनेश ठक्कर यांनी तळमजल्यापासून ते सातव्या मजल्यापर्यंत संपूर्ण इमारत खरेदी केली आहे. या इमारतीचा एकूण कारपेट एरिया 63,000 स्क्वेअर फूट इतका आहे. ही खरेदी देशातील सर्वात महागड्या आणि सर्वात मोठ्या निवासी डीलपैकी एक मानली जात आहे, आणि मुंबई रिअल इस्टेटमधील ही खरेदी ऐतिहासिक मानली जाते.
महत्त्वाचे म्हणजे ही खरेदी दिनेश ठक्कर यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी केली आहे. म्हणजेच आता ही संपूर्ण इमारत त्यांची स्वतःची खासगी वास्तू बनली आहे. मुंबईतल्या सर्वात महागड्या निवासी व्यवहारांमध्ये या डीलचा समावेश होतो.
आता दिनेश ठक्कर कोण आहेत हे पाहूया. ते मूळचे एका सर्वसामान्य कापड व्यावसायिक कुटुंबातले. भारतीय व्यावसायिक असलेले ठक्कर हे वित्तीय आणि शेअर मार्केट क्षेत्रातील ब्रोकिंग कंपनी एंजेल वनचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. 90 च्या दशकात त्यांनी शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवले आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. कोणतीही मोठी व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी पारंपरिक ब्रोकिंग व्यवसायाचे डिजिटल तंत्रज्ञानात रूपांतर केले आणि स्वतःचे मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. सामान्य कापड व्यावसायिक कुटुंबातून आलेला त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
एम्बेसी टेराझा या टॉवरमध्ये अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, प्रायव्हेट पार्किंग, लक्झरी डिझाइन आणि अनेक जागतिक दर्जाच्या सुख सुविधा उपलब्ध आहेत. जुहू तारा रोड हा भाग प्रामुख्याने बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपती राहत असलेला परिसर म्हणून ओळखला जातो, आणि याच परिसरातील ही खरेदी त्यामुळे विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
ही ऐतिहासिक डील पाहता मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रीमियम आणि लक्झरी घरांची मागणी किती वेगाने वाढते आहे हे स्पष्टपणे दिसून येते.