जेएसडब्ल्यू ग्रीनटेककडून इलेक्ट्रिक बस-ट्रकसाठी नवा ब्रँड AMPSTAR सादर
जेएसडब्ल्यू समूहाने कमर्शियल इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात पाऊल टाकले असून छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्पात वर्षाला १५,००० वाहने बनवण्याचे नियोजन आहे.
जेएसडब्ल्यू समूहाची व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडने AMPSTAR हा नवा ब्रँड बाजारात आणला आहे. या ब्रँडखाली कंपनी भारतात इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची रचना, निर्मिती आणि विक्री करणार आहे. या लाँचिंगसह समूहाने कमर्शियल मोबिलिटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. AMPSTAR: powered by JSW या ओळखीखाली हा ब्रँड बाजारात येईल.
छत्रपती संभाजीनगर येथील ग्रीनफील्ड प्रकल्पात या इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची निर्मिती होणार आहे. कंपनीने हे उत्पादन केवळ वाहन बनवण्यापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण सेवा म्हणून उभे केले आहे - चार्जिंग सुविधा, ऑपरेटिंग सोल्युशन्स, आर्थिक सहकार्य आणि विक्रीनंतरची सेवा यांचाही यात समावेश आहे, जेणेकरून चालक इलेक्ट्रिक वाहनांकडे आत्मविश्वासाने वळू शकतील. ग्राहकांना १५० kW ते ५०० kW या दरम्यानचे पॉवर कॉन्फिगरेशन निवडण्याचा पर्याय असेल. शिवाय थेट खरेदी, लीजिंग, बॅटरी ॲज अ सर्व्हिस (BaaS) यासह मालकी किंवा संचालनाचे वेगवेगळे पर्यायही ग्राहकांसमोर असतील.
छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक (AURIC) परिसरात ९० एकर जागेवर उभारलेला हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा एकात्मिक ईव्ही उत्पादन प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाची वार्षिक क्षमता १५,००० इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्सची आहे. बस उत्पादनासाठी भारतात प्रथमच 'प्री-ट्रीटमेंट आणि इलेक्ट्रो-डिपॉझिशन' (PT-ED) ही प्रक्रिया या प्रकल्पात वापरली जाणार आहे. यासोबतच स्वयंचलित ट्रक-कॅबिन लाइन आणि एकात्मिक बॅटरी इकोसिस्टमही प्लांटमध्ये असेल.
ही वाहने कंपनीने भारतातील रस्ते आणि वापराच्या परिस्थितीनुसार स्वतः विकसित केली आहेत. संपूर्ण इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेनसाठी लागणारी मूळ प्रणाली, सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदम जेएसडब्ल्यू ग्रीनटेकने स्वतः तयार केले असून, त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार वाहनांत बदल करता येतात. वाहनांमध्ये डबल कूलिंग बॅटरी सिस्टम आणि हाय-स्ट्रेंथ मोनोकॉक चेसिस बसवण्यात आले आहे, जे भारताचे हवामान आणि रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन बनवले गेले आहे.
ब्रँड लाँचप्रसंगी जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले, "इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी याकडे राष्ट्रनिर्मितीचे पाऊल म्हणून पाहिले, म्हणजेच आयात केलेल्या इंधनाऐवजी भारतातच तयार झालेल्या ऊर्जेवर वाहतूक चालवणे. जागतिक तेलाच्या किमतींवर आपले नियंत्रण नसते, पण त्यावर किती अवलंबून राहायचे हे आपल्या हातात असते. भारताच्या वाहतूक पद्धतीत बदल घडवण्याचे प्रभावी माध्यम AMPSTAR बनावे ही आमची इच्छा आहे. हा केवळ व्यवसायाचा प्रश्न नाही, तर आपण देश म्हणून कसे आहोत आणि कसे बनायचे आहे याचा मुद्दा आहे. ग्राहकाने इलेक्ट्रिक बस-ट्रक निवडण्याचे धाडस दाखवण्यासाठी भावनेपेक्षा आर्थिक व्यवहार्यता महत्त्वाची ठरते. हा निर्णय घेताना ऊर्जा सुरक्षा, लॉजिस्टिक्सचा कमी खर्च, भारतीय उद्योगांची जागतिक स्पर्धाक्षमता, देशातच उभी राहिलेली उत्पादन परिसंस्था आणि पुढच्या पिढीसाठी स्वच्छ भविष्य असे अनेक फायदे मिळतात. AMPSTAR टप्प्याटप्प्याने भारताच्या वाहतूक पद्धतीत बदल घडवण्याच्या दिशेने ही सुरुवात करत आहे."
जेएसडब्ल्यू समूहाचे पार्थ जिंदाल यांनी अधिक माहिती देताना सांगितले, "जेएसडब्ल्यूची संपूर्ण ताकद कमर्शियल मोबिलिटी क्षेत्रात आणणारा AMPSTAR हा उपक्रम आहे आणि त्यामागे भारतातील प्रवासी आणि मालवाहतुकीची पद्धत बदलण्याची एकच महत्त्वाकांक्षा आहे. अनेक महिने ग्राहक आणि संबंधित घटकांचे म्हणणे ऐकल्यानंतर लक्षात आले की या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यातील खरी आव्हाने वाहनापुरती मर्यादित नाहीत, तर त्यापलीकडे आहेत. त्यामुळेच ग्राहकांच्या संपूर्ण प्रवासाचा विचार करून फुल-स्टॅक इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटी सोल्यूशन तयार केले. AMPSTAR या नावात Amp हा शब्द Ampere या विद्युतप्रवाहाच्या एककावरून आला आहे आणि तो कार्यक्षमता दर्शवतो, तर Star हा शब्द आकांक्षा, नेतृत्व आणि प्रगती दर्शवतो. ग्राहकांच्या प्रवासात सोबत राहून इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संक्रमण सोपे, विश्वासार्ह आणि फायदेशीर बनवणे हे आमचे वचन आहे."
ग्राहकांसाठीच्या व्यावसायिक फायद्यांबाबत जेएसडब्ल्यू ग्रीनटेक लिमिटेडचे सीईओ सुमित मित्तल म्हणाले, "इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीसाठीचे आमचे व्हिजन असलेल्या AMPSTAR ची आज सुरुवात होत आहे. या वाहनांची रचना, अभियांत्रिकी आणि निर्मिती भारतातच सुरुवातीपासून केली असून, स्वतःचे ड्राइव्हट्रेन आणि सॉफ्टवेअर वापरले आहे, तसेच भारतीय रस्ते आणि कामकाजाच्या परिस्थितीला अनुरूप अशी ही वाहने बनवली आहेत. बसेसच्या बाबतीत ७ मीटर ते १८ मीटर लांबीच्या बसेस पोर्टफोलिओत असतील, ज्या कर्मचारी वाहतूक, शहर व आंतर-शहर वाहतूक आणि शालेय वाहतुकीसाठी उपयुक्त ठरतील. ट्रक्सच्या बाबतीत ५५-टन क्षमतेच्या ट्रॅक्टर-ट्रेलरपासून सुरुवात करत आहोत, जी वाहन रचनेच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक श्रेणी मानली जाते. येत्या काळात टिपर्स आणि फिक्स्ड-बॉडी डंपर्सच्या श्रेणीतही विस्तार करण्याची योजना आहे. भारतातील रस्त्यांवर जागतिक दर्जाच्या बसेस आणि ट्रक्स आणण्याचे उद्दिष्ट AMPSTAR च्या माध्यमातून साध्य करत आहोत."