जिओभारत 4G फोनवर सहा महिन्यांचे रिचार्ज मोफत, 1499 रुपयांत ऑफर
रिलायन्स जिओने 10व्या वर्धापन दिनानिमित्त निवडक जिओभारत 4G मॉडेलवर सहा रिचार्ज सायकलचा लाभ देणारी ऑफर आणली आहे.
रिलायन्स जिओने आपल्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त (10th Anniversary) एक नवी ऑफर आणली आहे. 'जिओभारत' (JioBharat) 4G फोन घेणाऱ्या ग्राहकांना सहा महिन्यांच्या रिचार्जचा पॅकेज प्लॅन मिळणार आहे. भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आपले स्थान आणखी मजबूत करणे आणि अजूनही 2G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना डिजिटल युगात आणणे, हा या ऑफरचा उद्देश आहे. महागडा स्मार्टफोन वापरण्यात रस नसलेल्या, पण इंटरनेट आणि डिजिटल सेवा हव्या असलेल्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी ठरत आहे.
या ऑफरअंतर्गत निवडक 'जिओभारत' मॉडेल 1499 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून दिले जात आहेत. फोन घेतल्यावर ग्राहकांना सलग सहा महिने दरमहा डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या 2G फीचर फोन वापरणारा सामान्य ग्राहक रिचार्जवर दरमहा साधारण 199 रुपये खर्च करतो. त्या हिशोबाने सहा महिन्यांत त्याचा एकूण खर्च सुमारे 1200 रुपयांपर्यंत जातो. ग्राहकाने 1499 रुपये भरून हा 4G फोन घेतला, तर त्याला सहा महिन्यांचे रिचार्जही मिळते. त्यामुळे 2G वरून थेट 4G वर जाण्यासाठीचा अतिरिक्त खर्च केवळ 299 रुपयांच्या घरात पडतो, असा कंपनीचा दावा आहे. मात्र ग्राहकाला सुरुवातीला पूर्ण 1499 रुपयेच भरावे लागतील. फोन 299 रुपयांत मिळणार नाही, तर 2G च्या तुलनेत होणारा अतिरिक्त खर्च 299 रुपये आहे.
प्रत्येक रिचार्ज 28 दिवसांच्या सायकलचा (Cycle) असेल. प्रत्येक सायकलमध्ये 14GB हाय-स्पीड डेटा मिळेल, म्हणजे दररोज सुमारे 500 MB डेटा वापरता येईल. त्यासोबत अमर्याद (Unlimited) व्हॉईस कॉलिंग आणि दरमहा 300 SMS मिळतील. जास्तीत जास्त सहा रिचार्ज सायकलपर्यंत हा लाभ घेता येतो आणि सहा महिन्यांत एकूण 84GB डेटा मिळतो. एका सायकलमधील न वापरलेला डेटा किंवा इतर फायदे पुढच्या सायकलमध्ये फॉरवर्ड (Carry Forward) होत नाहीत.
जिओभारत हा फक्त कॉलिंगचा साधा फोन नाही. यात 2.4 इंचाचा डिस्प्ले आणि 2000mAh ची बॅटरी आहे, ज्यामुळे बॅटरी बॅकअप दीर्घकाळ मिळतो. जिओटीव्हीवर (JioTV) 500 हून अधिक लाईव्ह चॅनेल, जिओहॉटस्टारवर (JioHotstar) क्रिकेट आणि मनोरंजनाचे कार्यक्रम, जिओम्युझिक, तसेच जिओपे (JioPay) मार्फत यूपीआय (UPI) पेमेंटची सोय या फोनमध्ये आहे.
ही ऑफर पूर्णपणे बिनशर्त नाही. जिओच्या नियमांनुसार ग्राहकांना पात्र ठरलेलेच डिव्हाईस खरेदी करावे लागेल. फोन आणि जिओ सिमचा आयएमईआय (IMEI) नंबर एकमेकांशी लिंक असणे अनिवार्य आहे. तसेच सिम कार्ड फोनच्या प्रायमरी किंवा सिम स्लॉट 1 मध्येच असले पाहिजे. जिओभारत A1, B1, B2 आणि B3 या निवडक मॉडेलवरच हा प्लॅन लागू होतो. सहा महिन्यांचे फायदे मिळवण्यासाठी सलग रिचार्ज सायकल पूर्ण करणे आवश्यक आहे.