१ नोव्हेंबरच्या इंडिया आघाडीच्या रॅलीला कॉकरोच जनता पार्टीचा पाठिंबा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी रामलीला मैदानावरील रॅलीला पाठिंबा जाहीर केला, तर राहुल गांधी यांनी तरुणांना न घाबरण्याचे आवाहन केले.
इंडिया आघाडीने १ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या 'दिल्ली चलो' मोर्चाला कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पाठिंबा दर्शवला आहे. पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी याबद्दल माहिती दिली.
या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी विद्यार्थी संघटनांना केले होते. "पोलिसांच्या लाठीचार्जची चिंता करू नका. घाबरण्याची गरज नाही," असेही ते म्हणाले. त्यानंतर सीजेपी या रॅलीत उतरणार का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यावर रांका यांनी उत्तर दिले.
रांका यांनी सांगितले की, पक्षाचे समर्थक रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीत सहभागी होऊ शकतात. सीजेपीने इंडिया आघाडीच्या रॅलीत सामील होण्याचे संकेतही दिले आहेत. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभिप्राय मागवला जात आहे.
रॅलीच्या तयारीसाठी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची बैठक झाली. प्रियांका गांधी यांच्यासह आघाडीचे अनेक नेते या बैठकीला हजर होते. राहुल गांधी यांनी एका व्हिडीओद्वारे मोर्चाला येण्याचे आवाहन केले.
राहुल गांधी म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षासाठी नाही, तर भारताचा आत्मा वाचवण्यासाठी आहे. भारतीय संविधान आणि राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी हा मोर्चा आहे. १ नोव्हेंबरचा मोर्चा लोकशाही वाचवण्यासाठी, मतचोरी रोखण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे, असे त्यांनी सांगितले. देशाची लोकशाही, संविधान, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
इंडिया आघाडी आणि सीजेपी यांच्याकडून एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यवहारांविरोधात सातत्याने आंदोलने केली जात आहेत. दोन्ही पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
याच मुद्द्यावर विरोधी आघाडी शुक्रवारी दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'सार्वजनिक महाभियोग' कार्यक्रम घेणार आहे. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते त्यात सहभागी होतील. इतर ठिकाणी परवानगी मिळाली नाही, म्हणून हा कार्यक्रम आता दुपारी ३:३० वाजता १० राजाजी मार्ग येथे होईल. रामलीला मैदानावरील १ नोव्हेंबरच्या सभेच्या आधी हा कार्यक्रम होणार आहे. सार्वजनिक महाभियोगात जनता किंवा राजकीय पक्ष घटनात्मक पद धारण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन करतात, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करतात आणि राजीनाम्याची मागणी करत जनदबाव निर्माण करतात.
एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ८ निदर्शने केली. कॉकरोच जनता पार्टी आणि डाव्या पक्षांनीही १० ऑक्टोबर रोजी याच मुद्द्यावर निदर्शनाचे आवाहन केले होते, पण दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. या काळात शहरात बॅरिकेड्स लावण्यात आले, ४५ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आणि ७,००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.