दिवाळीत आभाळ स्वच्छ, रात्री गुलाबी थंडी; हवामान विभागाचा पहिला अंदाज
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
यंदा राज्यात थंडी कशी राहील, याचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दिवाळीत पाऊस किंवा ढगाळ हवा नसेल आणि रात्री हलकी थंडी जाणवेल.
यंदा राज्यात थंडी कशी राहील आणि गारठा जाणवणार की नाही, याबद्दल भारतीय हवामान विभागाने (IMD) आपला पहिला अंदाज दिला आहे. या अंदाजानुसार यावर्षी दिवाळीच्या काळात पावसाची किंवा ढगाळ हवेची शक्यता नाही. आभाळ स्वच्छ आणि निरभ्र राहील, असं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
पश्चिमेकडून थंड वारे येत आहेत. त्या वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात घट होईल आणि हलकी थंडी जाणवेल. दिवाळीत गुलाबी थंडीचं वातावरण राहील आणि लोकांना या थंडीचा आनंद घेता येईल. मात्र दिवसाचं तापमान सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पश्चिम दिशेकडून येणारे वारे हळूहळू वाढत जातील आणि त्यानंतर थंडीला सुरुवात होईल. साधारणपणे दिवाळीच्या दिवसांत ढगाळ हवा आणि हलका पाऊस असण्याचा अंदाज असतो. यावेळी मात्र आभाळ स्वच्छ राहणार आहे आणि असं पहिल्यांदाच घडत आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. म्हणजेच राज्यात आता हळूहळू थंडी सुरू होणार आहे.
या अंदाजाची पार्श्वभूमी पावसाच्या कमतरतेची आहे. यंदा पावसाला एल निनोचा चांगलाच फटका बसला. एल निनोमुळे देशात आणि राज्यात मान्सूनचं प्रमाण अत्यल्प राहिलं. सुरुवातीला जूनच्या चौथ्या आठवड्यात आणि जुलै महिनाभर राज्यात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसात प्रदीर्घ खंड पडला.
या खंडाचा खरीप हंगामाला मोठा फटका बसला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. खरीप हंगाम हातचा गेला, तरी निदान रब्बी हंगामासाठी तरी पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतही पाऊस न झाल्याने रब्बी हंगामही संकटात सापडला आहे.
राज्यात पुरेसा पाऊसच न झाल्याने आता पाणी टंचाईची समस्याही जाणवायला सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शहरी भागातही पाणी टंचाई जाणवत आहे. काही दिवसांनी ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.