सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:02 IST

इक्वेडोरमध्ये लाइव्ह प्रार्थनेत क्रूस अंगावर पडून फादर पॅट्रिसिओ सांचेझ यांचा मृत्यू

ग्वायाकिलमधील पर्पेटुओ सोकोरो चर्चमध्ये थेट प्रक्षेपण सुरू असताना जड लाकडी क्रूस कोसळला; उपचारादरम्यान फादर सांचेझ यांना मृत घोषित करण्यात आले.

इक्वेडोरमध्ये लाइव्ह प्रार्थनेत क्रूस अंगावर पडून फादर पॅट्रिसिओ सांचेझ यांचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशातून एक धक्कादायक बातमी आली आहे. ग्वायाकिल (Guayaquil) या किनारपट्टीच्या शहरातील पर्पेटुओ सोकोरो चर्चमध्ये सायंकाळच्या प्रार्थनेदरम्यान झालेल्या अपघातात रोमन कॅथोलिक धर्मगुरू फादर पॅट्रिसिओ अल्फ्रेडो सांचेझ मोलिनारी (Fr. Patricio Alfredo Sánchez Molinari) यांचा मृत्यू झाला. प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण (Livestreaming) सुरू असतानाच वेदीच्या मागे भिंतीवर टांगलेला जड लाकडी क्रूस खाली निसटला आणि थेट त्यांच्या डोक्यावर आदळला.

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. जगभरातील भाविक त्यावर तीव्र शोक व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रार्थना सभा शनिवारी रात्री स्थानिक धार्मिक परंपरेनुसार आयोजित करण्यात आली होती. फादर सांचेझ वेदीजवळ उभे राहून उपस्थितांशी बोलत होते आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करत होते. त्याच वेळी मुख्य भिंतीला जोडलेला क्रूस अचानक निसटला. काही कळायच्या आतच तो त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर कोसळला. चर्चमधले भाविक सुन्न झाले, आरडाओरडा झाला आणि सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले.

भाविक आणि चर्चमधील कर्मचारी तातडीने फादर सांचेझ यांच्याकडे धावले आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. थेट प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यात भाविकांचा आकांत आणि रुग्णवाहिकेसाठी सुरू असलेली हाकाटी स्पष्ट ऐकू येत होती. काही मिनिटांतच आपत्कालीन वैद्यकीय मदत पथक (First Responders) घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या फादर सांचेझ यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डोक्याला आणि शरीराला झालेल्या अंतर्गत गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेतला सर्वात धक्कादायक योगायोग म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटे आधीच फादर सांचेझ आपल्या प्रवचनात "मृत्यू आणि मानवी जीवनाचे मूळ महत्त्व" या विषयावर बोलत होते. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले होते, "आपण सर्वांनी मोबाईल फोन आणि अनावश्यक भौतिक गोष्टींवर वेळ वाया घालवण्याऐवजी आपला मौल्यवान वेळ देव आणि आपल्या प्रियजनांसाठी समर्पित केला पाहिजे. एक दिवस आपल्या सर्वांनाच हे जग सोडून जायचे आहे, त्यामुळे जीवनातील खऱ्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे." हा संदेश देऊन त्यांनी पुढची प्रार्थना सुरू केलीच होती, तोच हा अपघात घडला.

फादर पॅट्रिसिओ सांचेझ हे "कॉन्ग्रेगेशन ऑफ द मोस्ट होली रिडीमर" (Congregation of the Most Holy Redeemer) या रोमन कॅथोलिक धार्मिक गटाचे सदस्य होते. हा गट १७३२ मध्ये स्थापन झाला असून जगभरातील ८० हून अधिक देशांत कार्यरत आहे. ग्वायाकिलच्या आर्चडायोसीसने (Archdiocese of Guayaquil) आणि चर्च प्रशासनाने फादर सांचेझ यांच्या निधनाबद्दल अधिकृत शोक संदेश जारी केला आहे.

भिंतीवर पक्का बसवलेला हा जड लाकडी क्रूस अचानक कसा निसटला, याबद्दल चर्च प्रशासनाने आणि स्थानिक प्रशासनाने अजून सविस्तर माहिती दिलेली नाही. या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ