हातकणंगल्यात धनबाद एक्स्प्रेसची धडक; इयरफोन लावून रुळावरून चालणाऱ्या १७ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू
कानात इयरफोन घालून मोबाईलवर बोलत रेल्वे रुळावरून चालणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीला हातकणंगल्याजवळ धनबाद एक्स्प्रेसची धडक बसून जागीच मृत्यू झाला.
कानात इयरफोन घालून मोबाईलवर बोलत रेल्वे रुळावरून चालत असलेल्या एका १७ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीचा धनबाद एक्स्प्रेसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव अनुष्का संतोष पोवार (वय १७, राहणार इचलकरंजी) असे आहे. बुधवारी सकाळी हातकणंगले रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली असून परिसरात याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
अनुष्का इचलकरंजीची राहणारी असून ती महाविद्यालयात शिकणारी तरुणी होती. बुधवारी सकाळी ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत हातकणंगले भागात आली होती. सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघीजणी हातकणंगले रेल्वे स्टेशनजवळील रुळावरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी अनुष्काच्या कानात इयरफोन होते आणि ती फोनवर बोलण्यात मग्न होती. नेमकी त्याचवेळी मागच्या बाजूने धनबाद एक्स्प्रेस त्या दिशेने येत होती.
ट्रेन जवळ येताना पाहून तिच्या मैत्रिणींचे लक्ष आधी त्या ट्रेनकडे गेले आणि त्यांनी अनुष्काला रुळावरून बाजूला होण्याचा इशारा दिला. त्यांनी ओरडून, आरडाओरड करून तिला सावध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कानात इयरफोन असल्याने आणि ती फोनवरील बोलण्यात व्यग्र असल्याने तिला ना ट्रेनचा हॉर्न ऐकू आला, ना मैत्रिणींचा आवाज. अवघ्या काही क्षणांत ट्रेन तिच्याजवळ पोहोचली आणि तिला जोरदार धडक बसली. या धडकेत ती रुळाबाहेर फेकली गेली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटना घडताच तिच्या मैत्रिणींनी आणि आजूबाजूला असलेल्या स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन तातडीने मदत केली आणि तिला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेमुळे अनुष्काच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या तिच्या दोन्ही मैत्रिणींनाही या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.